कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 8, 2019 06:32 AM2019-07-08T06:32:32+5:302019-07-08T06:32:51+5:30

कर्नाटकमधील घडामोडींना भाजप जबाबदार नसल्याचे सांगत, त्या पक्षाच्या केंद्रीय व स्थानिक स्तरातील नेत्यांनी हात वर केले आहेत.

BJP's efforts to fall Karnataka government; Congress allegations | कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

कर्नाटक सरकार पाडण्यासाठी भाजपचे प्रयत्न; काँग्रेसचा आरोप

Next

बंगळुरू : कर्नाटकमधील राजीनामा दिलेल्या १३ आमदारांना बंगळुरूहून मुंबईला आणण्यासाठी ‘हाल'च्या विशेष विमानाची सोय भाजपच्या केंद्रीय नेत्यांच्या पाठिंब्यामुळेच झाली, असा आरोप काँग्रेसचे ज्येष्ठ नेते मल्लिकार्जुन खरगे यांनी केला आहे. कुमारस्वामी सरकार पाडण्यासाठी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा व भाजप प्रयत्न करीत असल्याचेही ते म्हणाले. राजकीय स्थिती आणखी बिकट झाल्यामुळे मुख्यमंत्री एच. डी. कुमारस्वामी आपला अमेरिका दौरा अर्धवट सोडून रविवारी बंगळुरूला परतले आहेत.


कर्नाटकमधील घडामोडींना भाजप जबाबदार नसल्याचे सांगत, त्या पक्षाच्या केंद्रीय व स्थानिक स्तरातील नेत्यांनी हात वर केले आहेत. ‘वेट अँड वॉच' असे सांगून भाजपचे नेते व माजी मुख्यमंत्री येडीयुरप्पा यांनी या प्रकरणातले गूढ आणखी वाढविले आहे. शनिवारी राजीनामा दिलेल्या आमदारांपैकी नऊ काँग्रेसचे व तीन जनता दल (एस)चे आहेत. या घडामोडींमुळे कुमारस्वामींच्या सरकारला पाठिंबा देणाऱ्या आमदारांची संख्या १०५ पर्यंत खाली घसरली आहे. या सरकारला बहुमतासाठी ११३ मतांची आवश्यकत असून त्यासाठी आता आठ जणांची कमतरता जाणवत आहे. भाजप नेते येडीयुरप्पांनी सांगितले की, आमदारांनी दिलेल्या राजीनाम्याबाबत कर्नाटकचे विधानसभा अध्यक्ष काय निर्णय घेतात त्याची वाट पाहात आहोत. त्यानंतर भाजप आपला निर्णय घेईल. कर्नाटकमध्ये सध्या ज्या घडामोडी सुरू आहेत त्याच्याशी माझा व भाजपचा काहीही संबंध नाही. मात्र राज्यपालांनी सरकार स्थापन करण्यास सांगितले तर त्यासाठी आमची तयारी आहे.


माजी केंद्रीय मंत्री मल्लिकार्जून खरगे म्हणाले की, बिगरभाजपा राज्य सरकारांबद्दल मोदी सरकारने हेच घोरण अवलंबले आहे. पश्चिम बंगालपाठोपाठ आता कर्नाटकमध्येही तोच खेळ सुरू झाला आहे. पश्चिम बंगाल, गोवा, अरुणाचल प्रदेश, मणिपूर, बिहार, झारखंडसारख्या १३-१४ राज्यांमध्ये भाजपने लोकशाहीचा गळा घोटण्याचे काम केले आहे. कुमारस्वामी सरकारला कोणताही धोका नाही असा दावा काँग्रेसचे नेते व कर्नाटकचे माजी मुख्यमंत्री सिद्धरामय्या यांनी केला आहे.

‘ते' विमान भाजप खासदाराच्या कंपनीचे
कर्नाटकमधील आमदारांना बंगळुरूहून मुंबईला ज्यातून आणले गेले, ते विशेष विमान भाजपचे राज्यसभा खासदार राजीव चंद्रशेखर यांच्या हे विमान ज्युपिटर कॅपिटल प्रायव्हेट लिमिटेड या कंपनीचे होते, असे सूत्रांनी सांगितले. चंद्रशेखर हे त्या कंपनीचे संस्थापक व अध्यक्ष आहेत. ते विमान सतत कोणी ना कोणी भाड्याने घेऊ शकते. तो आमचा व्यवसाय आहे, असे कंपनीच्या सूत्रांनी सांगितले. या विमानाचे बुकिंग कोणी कोणासाठी केले होते, याची माहिती देण्यास मात्र कंपनीच्या प्रवक्त्याने नकार दिला.


देवेगौडांशी चर्चा
कर्नाटकचे जलसंपदामंत्री व काँग्रेस नेते डी. के. शिवकुमार यांनी जनता दल (एस)चे प्रमुख देवेगौडा यांची त्यांच्या निवासस्थानी भेट घेऊन राज्यातील राजकीय स्थितीवर चर्चा केली. असंतुष्ट आमदार आपले राजीनामे मागे घेतील, असा विश्वास डी. के. शिवकुमार यांनी व्यक्त केला.




मुंबईतील हॉटेलबाहेर काँग्रेस कार्यकर्त्यांची निदर्शने
मुंबई : कर्नाटकातील सत्ताधारी पक्षाच्या बंडखोर आमदारांनी शनिवारी राजीनामा देऊन थेट मुंबईतील सोफिटेल हॉटेल गाठले. एकीकडे काँग्रेस नेते मनधरणीसाठी या आमदारांची भेट घेण्याच्या प्रयत्नात आहेत, तर दुसरीकडे युवक काँग्रेसच्या कार्यकर्त्यांनी रविवारी हॉटेलबाहेर घोषणाबाजी केली.
महाराष्ट्रातील काँग्रेस नेत्यांनी या बंडखोर आमदारांची भेट घेण्याचा प्रयत्न केला असता, पोलिसांनी त्यांना हॉटेलबाहेरच रोखले. पोलीस पक्षपातीपणा करत असल्याचा आरोप आ. नसीम खान यांनी केला. पोलिसांनी हॉटेलमध्ये जाण्यास मज्जाव केल्यानंतर कार्यकर्त्यांनी हॉटेलबाहेर निदर्शने करत जोरदार घोषणाबाजी केली. दुसरीकडे भाजपचे आमदार प्रसाद लाड, मोहीत भारतीय हे हॉटेलमध्ये थांबलेल्या आमदारांच्या संपर्कात आहेत. दिवसभर त्यांची ये-जा सुरू होती. कर्नाटकातील काँग्रेस आमदार महेंद्र सिंगी यांनी हॉटेलमध्ये थांबलेले बंडखोर आमदार रमेश जारकीहोळी यांची भेट घेतली. कर्नाटकातील सध्याचा पेचप्रसंग नवा नाही, लवकरच परिस्थिती निवळेल, असे सिंगी यांनी नंतर माध्यमांशी बोलताना सांगितले.

Web Title: BJP's efforts to fall Karnataka government; Congress allegations

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.