भाजपचा सलग पाचवा पराभव; झारखंडही गेले, आघाडीला बहुमत

By ऑनलाइन लोकमत | Published: December 24, 2019 07:30 AM2019-12-24T07:30:06+5:302019-12-24T07:30:12+5:30

हेमंत सोरेन होणार मुख्यमंत्री : ८१ पैकी ४७ जागांवर आघाडी; भाजपला २५ जागा

BJP's fifth consecutive defeat; Jharkhand is also gone, leading majority | भाजपचा सलग पाचवा पराभव; झारखंडही गेले, आघाडीला बहुमत

भाजपचा सलग पाचवा पराभव; झारखंडही गेले, आघाडीला बहुमत

Next

रांची : झारखंडमधील विधानसभा निवडणुकीत सत्ताधारी भाजपचा दणदणीत पराभव झाला असून, त्या पक्षाला २६ जागांवरच विजय मिळाला आहे. काँग्रेस-झारखंड मुक्ती मोर्चा व राष्ट्रीय जनता दल यांच्या आघाडीने ८१ पैकी ४७ जागांवर विजय मिळविला असून, झामुमोचे नेते हेमंत सोरेन हेच राज्याचे मुख्यमंत्री होणार, हे स्पष्ट झाले आहे. भाजपचे नेते व मुख्यमंत्री रघुबर दास यांच्यासह त्यांच्या पाच मंत्र्यांचा जनतेने या निवडणुकीत पराभव केला.

मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, महाराष्ट्र यांच्यापाठोपाठ आता झारखंडमध्येही भाजपला विरोध करणाऱ्या पक्षांचे सरकार येणार आहे. त्यापैकी तीन राज्यांत काँग्रेसचे बहुमताचे सरकार असून, महाराष्ट्र व झारखंडमध्ये सत्ताधारी आघाडीमध्ये काँग्रेस आहे.
झामुमोला ३0 व काँग्रेसला १६ जागांवर यश मिळाले असून, राजदचा एक उमेदवार विजयी झाला आहे. चार जागांवर अपक्ष व अन्य विजयी झाले आहेत. त्यात राष्ट्रवादी काँग्रेसचे कमलेश कुमार सिंग हेही आहेत.

पंतप्रधानांनी दिल्या शुभेच्छा
झारखंडमधील विजयाबद्दल हेमंत सोरेन यांचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी अभिनंदन केले. सोरेन यांना शुभेच्छा देताना मोदी यांनी म्हटले आहे की, आमचा राज्यात पराभव झाला असला तरी राज्यातील जनतेच्या प्रश्नांसाठी भाजप सतत आवाज उठवत राहील. गेली पाच वर्षे झारखंडमधील जनतेने आम्हाला जी सेवेची संधी दिली, त्याबद्दल मी जनतेचा आभारी आहे.

सोरेन दोन्ही ठिकाणी विजयी
हेमंत सोरेन हे दुमका व बरहैट या दोन्ही मतदारसंघांतून विजयी झाले आहेत. झारखंडचे माजी मुख्यमंत्री शिबू सोरेन यांचे ते पुत्र आहेत. हेमंत सोरेन हे अवघे ४४ वर्षांचे असून, तेही काही काळ राज्याचे मुख्यमंत्री होते.

येथे प्रचारासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी, भाजप अध्यक्ष अमित शहा व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी मिळून २५ सभा घेतल्या होत्या. भाजपने अनेक अन्य नेतेही प्रचारात उतरवले होते. काँग्रेसप्रणित आघाडीच्या प्रचाराची सारी धुरा मात्र हेमंत सोरेन यांच्यावर होती.

जनमताचा आदर - अमित शहा
भाजपचे अध्यक्ष अमित शहा म्हणाले की, झारखंडमधील जनतेला कौल मान्य आहे. आम्ही जनमताचा आदर करतो. झारखंडच्या जनतेने आम्हाला पाच वर्षे सरकार चालवण्याची, सेवा करण्याची संधी दिली, त्याबद्दल आम्ही जनतेचे ऋणी आहोत. पक्षासाठी कार्यकर्त्यांनी
जे प्रयत्न केले, त्याबद्दल मी त्यांचेही आभार मानतो.

 

Web Title: BJP's fifth consecutive defeat; Jharkhand is also gone, leading majority

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.