भाजपाची पहिली यादी फायनल! प्रज्ञा ठाकुर यांच्या जागी शिवराज; 100 उमेदवार जाहीर होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: March 1, 2024 12:51 PM2024-03-01T12:51:28+5:302024-03-01T12:53:12+5:30
BJP Loksabha candidate First List Final: पहिल्या यादीतच मोदी-शाह धक्कातंत्र देण्याच्या तयारीत. भाजपमधील सुत्रांनुसार पहिली यादी एक-दोन दिवसांत येऊ शकते.
भाजपानेलोकसभा उमेदवारांच्या पहिल्या यादीसाठी गुरुवारी रात्री मुख्यालयामध्ये मॅरेथॉन बैठक घेतली होती. या बैठकीला त्या त्या राज्यांचे नेते, पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शाह यांच्यासह सर्व केंद्रीय स्तरावरील नेते पहाटे साडे तीनपर्यंत उपस्थित होते. या बैठकीत भाजपाने १०० उमेदवारांची पहिली यादी निश्चित केली आहे. भाजपमधील सुत्रांनुसार पहिली यादी एक-दोन दिवसांत येऊ शकते. या यादीत अनेक शॉकिंग बदल केले जाण्याची शक्यता आहे.
या यादीमध्ये पीएम मोदी (वाराणसी), गृहमंत्री अमित शहा (गांधीनगर), राजनाथ सिंह (लखनऊ) यांच्यासह बड्या नेत्यांची नावे असणार आहेत. तसेच 2019 मध्ये भाजपने कमी फरकाने गमावलेल्या किंवा जिंकलेल्या 'कमकुवत' जागांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले आहे.
काल रात्री झालेल्या बैठकीत उत्तर प्रदेश, मध्य प्रदेश, उत्तराखंड, गुजरात, आसाम, तेलंगणा, केरळ आदी राज्यांचा समावेश होता. या यादीमध्ये भूपेंद्र यादव, ज्योतिरादित्य शिंदे, निर्मला सीतारामन, धर्मेंद्र प्रधान, सर्बानंद सोनोवाल, व्ही मुरलीधरन यांचा समावेश आहे.
याचबरोबर विद्यमान खासदारांना ज्यांची कामगिरी चांगली नाहीय त्यांना डच्चू देऊन नवीन उमेदवार दिला जाण्याची शक्यता आहे.
दिल्लीतील भाजपाच्या खासदारांच्या जागा धोक्यात आहेत. यामुळे सातपैकी कमीतकमी तीन खासदारांना डच्चू मिळण्याची शक्यता आहे. तसेच बंगालमध्ये आसनसोलमधून तृणमूल खासदार शत्रुघ्न सिन्हा यांच्यविरोधात भोजपुरी स्टार पवन सिंह याला उतरविले जाण्याची शक्यता आहे.
तामिळनाडूमध्ये भाजपा अध्यक्ष अन्नामलाईंवर डाव खेळला जाण्याची शक्यता आहे. मध्य प्रदेशचा माजी मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान यांना भोपाळमधून रिंगणात उतरविले जाण्याची शक्यता आहे. या जागेवर वादग्रस्त साध्वी प्रज्ञा सिंह या खासदार आहेत. त्यांचा पत्ता कट होण्याची शक्यता आहे.