भाजपाचे आता शेतक-यांवर लक्ष, किसान मोर्चा सुधारणार सरकारची प्रतिमा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 22, 2017 04:40 AM2017-09-22T04:40:27+5:302017-09-22T04:40:36+5:30
शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : शेतक-यांची कमाई दुप्पट करण्याची ग्वाही देत सत्तेत आलेल्या भाजपाला शेतक-यांची पर्वा नाही, या आरोपांचा विरोधकांकडून सातत्याने भडिमार होत असल्याने सरकारची मलिन होणारी प्रतिमा सुधारण्याची जबाबदारी पक्षाने ‘किसान मोर्चा’वर सोपवली आहे.
शेतक-यांशी संबंधित अनेक योजना त्यांच्यापर्यंत पोहोचविण्यात अपेक्षेनुसार यश आलेले नाही, याची जाणीव भाजपाला झाली आहे. दुर्गम भागांतील शेतक-यांना योजनांची माहितीही नाही. सरकारचा निम्म्याहून अधिक कार्यकाळ संपला आहे. गुजरात, हिमाचल प्रदेशसह अनेक राज्यांत निवडणुकांना सामोरेही जायचे आहे. त्यानंतर लोकसभेच्या निवडणुका आहेत. तेव्हा डोकेदुखी निर्माण होऊ नये व विरोधक मजबूत होऊ नये, अशी भाजपाची इच्छा आहे.
पीकविमा, सिंचन, मृद्संधारण, स्वास्थ्य योजनांसह अन्य योजनांचा लाभ शेतकºयांपर्यंत पोहोचविण्याची जबाबदारी भाजपाने किसान मोर्चावर टाकली आहे. भाजपाच्या पदाधिकाºयांसह कार्यकर्त्यांना प्रशिक्षण देऊन त्यांच्यावर हे काम सोपविले जाणार आहे. या मोहिमेत सुमारे ५० हजार कार्यकर्त्यांना प्रशिक्षण दिले जाईल. प्रशिक्षित कार्यकर्ते गावागावांत शेतकºयांना सरकारच्या योजनांची माहिती देतील व या योजनांचा लाभ घेण्यासाठी शेतकºयांना प्रोत्साहन देतील.
>काँग्रेसमुळेच हे घडले
भाजपाच्या किसान मोर्चाचे राष्टÑीय अध्यक्ष वीरेंद्र सिंह मस्त म्हणाले की, काँग्रेसच्या चुकीच्या धोरणांमुळे शेती आणि शेतकºयांचे प्रश्न निर्माण झाले आहेत. शेतकºयांची स्थिती सुधारल्याशिवाय कृषी क्षेत्रात सुधारणा होणार नाही. मोदी सरकार शेतकºयांची स्थिती सुधारण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहे.