भाजपचे लक्ष योजनांच्या लाभार्थ्यांवर; अल्पसंख्याक महिलांनाही सरकारी योजनेचे फायदे सांगणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 18, 2024 05:49 AM2024-04-18T05:49:04+5:302024-04-18T05:50:02+5:30
नवी रणनिती : अल्पसंख्याक महिलांनाही सरकारी योजनेचे फायदे सांगणार
संजय शर्मा, लोकमत न्यूज नेटवर्क
नवी दिल्ली : कोणतेही ठोस मुद्दे नसताना या निवडणुकीत भाजप विविध योजनांच्या लाभार्थ्यांना आपलेसे करत आहे. अल्पसंख्याक महिलांनाही तीन तलाक ते मोफत धान्य, आयुष्मान योजना यासह केंद्र सरकारच्या योजनांचे लाभ सांगितले जात आहेत.
पहिल्या टप्प्यातील मतदान शुक्रवारी होत आहे. अब की बार ३७० पारचा नारा देणाऱ्या भाजपला आता मतांसाठी केंद्र सरकारच्या योजनांच्या लाभार्थ्यांपर्यंत जावे लागत आहे. प्रत्येक मतदान बुथ, वॉर्ड स्तरावरील लाभार्थ्यांची यादी भाजप कार्यकर्त्यांना देण्यात आली आहे. हे कार्यकर्ते लाभार्थ्यांकडे जाऊन त्यांना भाजप सरकारच्या योजना आणि मोदी की गॅरंटी याची माहिती देत आहेत. अल्पसंख्याक भागाकडे विशेष लक्ष देण्यात येत आहे. भाजपचा अल्पसंख्याक मोर्चा आणि महिला मोर्चा बैठका, सभा घेऊन योजनांचे लाभ सांगत आहेत.
लोकांना काय सांगणार?
भाजपचे वरिष्ठ रणनीतिकार राष्ट्रीय सरचिटणीस अरुण सिंह यांनी सांगितले की, ८० कोटी मोफत रेशनचे लाभार्थी आहेत. पंतप्रधान आवास योजनेचे चार कोटी, आयुष्मान योजनेचे २० कोटी, जन धन योजनेचे ५० कोटी, उज्ज्वला योजनेचे ५ कोटी तर, किसान सन्मान योजनेचे १० कोटींहून अधिक लाभार्थी आहेत. त्यांना हे सांगायचे आहे की, जर भाजपचे सरकार आले, तर यापुढेही त्यांना याचा लाभ मिळणार आहे. हे काम भाजपचे कार्यकर्ते आणि नेते देशात करत आहेत.