२८२ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे भाजपाचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2018 05:10 AM2018-05-18T05:10:48+5:302018-05-18T05:10:48+5:30
कर्नाटकमध्ये एकीकडे येदियुरप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन भाजपा सरकार बनवण्याच्या तयारीत असतानाच देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा हे २०१९च्या तयारीला लागले आहेत.
नितीन अग्रवाल
नवी दिल्ली : कर्नाटकमध्ये एकीकडे येदियुरप्पा मुख्यमंत्रिपदाची शपथ घेऊन भाजपा सरकार बनवण्याच्या तयारीत असतानाच देशाच्या राजधानीत पंतप्रधान नरेंद्र मोदी व पक्षाध्यक्ष अमित शहा हे २०१९च्या तयारीला लागले आहेत. त्यांनी दिल्लीतील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या बैठकीत पक्षाच्या सर्व मोर्चांना यशाचा मंत्र दिला. लोकसभा निवडणुकीत २८२ पेक्षा अधिक जागा मिळवण्याचे लक्ष्यही त्यांनी पक्षाच्या कार्यकर्त्यांसमोर ठेवले.
भाजपाच्या विविध मोर्चांच्या नेत्यांनी सरकारी योजनांचा लाभ अधिकाधिक लोकांपर्यंत पोहोचवून पक्ष संघटन मजबूत करावे, असा मंत्र मोदी यांनी दिला. सर्व मोर्चांनी आपापल्या भागांमध्ये युवा व बुद्धिजीवींना पक्षाशी जोडून बूथस्तरावर पक्षाचे संघटन मजबूत करावे, असेही त्यांनी सांगितले.
बैठकीला हजर असलेल्या एका नेत्याने सांगितले की, २०१९ मध्ये प्रथमच मतदान करणाऱ्या मतदात्यांकडे विशेष लक्ष देण्यास सांगण्यात आले आहे. मतदान ओळखपत्र तयार करण्यात मदत करून त्यांना पक्षात सहभागी करून घ्यावे. याशिवाय मतदानासाठी मतदारांमध्ये जागृती करण्यासही सांगण्यात आले. सरकारी योजनांच्या माध्यमातून जास्तीत जास्त लोक पक्षाशी जोडण्यासाठी जिल्हा स्तरापासून बुथ स्तरापर्यंत वृक्षारोपण, बेटो बचाओ-बेटी पढाओ, स्कूल चलो अभियान, आरोग्य व रक्तदान शिबीर, आरोग्य कार्ड, जलसंरक्षण व एससी-एसटी हॉस्टेलसारख्या उपक्रम राबवावे, असेही सांगण्यात आले आहे.
आज बैठकीच्या सुरुवातीला अध्यक्ष अमित शहा यांचे भाषण झाले व समारोप मोदींनी केला. बैठकीत देशभरातील २१ हजार गावांत चाललेल्या ग्रामस्वराज अभियानाचीही चर्चा करण्यात आली.
>२२ कोटी मते मिळवण्याचे लक्ष्य
२०१४मध्ये भाजपला १७ कोटी लोकांनी मते दिली होती. पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी कार्यकर्त्यांना २०१९मध्ये लोकसभेच्या २८२ पेक्षा अधिक जागा जिंकण्याचे लक्ष्य दिले. यासाठी २२ कोटी मते मिळवाली लागतील, असेही त्यांनी सांगितले. हे लक्ष्य गाठण्यासाठी २२ कोटी कुटुंब जोडण्याचे लक्ष्य ठेवण्यात आले आहे. असे केल्यानेच भाजपाला २८२ पेक्षा जास्त जागा मिळतील. केवळ सरकार बनवणे, हा भाजपाचा उद्देश नसून, भारताला विश्वगुरू बनवायचे आहे, असेही शहा म्हणाले.