धार्मिक मुद्द्यांवर प्रवक्त्यांसाठी भाजपच्या मार्गदर्शक सूचना
By ऑनलाइन लोकमत | Published: June 8, 2022 06:11 AM2022-06-08T06:11:20+5:302022-06-08T06:11:41+5:30
BJP : भाजपच्या एक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानुसार सर्व नेते आणि प्रवक्त्यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय प्रसार माध्यम विभागाच्या परवानगीशिवाय निवेदन जारी करु नयेे.
- शरद गुप्ता
नवी दिल्ली : भाजपने नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल सारख्या घटनांची पुनरावृत्ती टाळण्यासाठी पक्ष प्रवक्त्यांसाठी मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत. यात विशेषत: धार्मिक भावना दुखावू नयेत, असे निर्देश दिले आहेत.
भाजपच्या एक राष्ट्रीय पदाधिकाऱ्यानुसार सर्व नेते आणि प्रवक्त्यांना कठोर निर्देश देण्यात आले आहेत की, त्यांनी राज्यसभा सदस्य अनिल बलुनी यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रीय प्रसार माध्यम विभागाच्या परवानगीशिवाय निवेदन जारी करु नयेे. कोणता प्रवक्ता,कोणत्या टीव्ही चॅनलवर पक्षाची बाजू मांडेल, हे भाजपची माध्यम समिती ठरविते. यासाठी त्यांच्यासाठी वेळोवेळी प्रशिक्षण कार्यशाळाही आयोजित केल्या जातात.
भाजपच्या नुपूर शर्मा आणि नवीन जिंदाल यांंनी एका विशिष्ट धर्माविषयी आक्षेपार्ह वक्तव्य केले होते. त्यानंतर इस्लामिक देशांनी भारताविरुद्ध राजकीय स्तरावर विरोध व्यक्त केला. तसेच भारतीय उत्पादनावर बहिष्काराचे आवाहनही केले. त्या पार्श्वभूमीवर भाजपने उपरोक्त मार्गदर्शक सूचना जारी केल्या आहेत.
नुपूर शर्मा यांना सुरक्षा
नवी दिल्ली : वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे पक्षातून निलंबित केलेल्या भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा व त्यांच्या कुटुंबीयांना दिल्ली पाेलिसांनी सुरक्षा दिली आहे. शर्मा यांना जीवे मारण्याच्या धमक्या प्राप्त झाल्याची तक्रार दाखल करण्यात आली हाेती. त्यानंतर शर्मा यांनी संरक्षण देण्याबाबत विनंती केली हाेती. एकंदर परिस्थितीचा विचार करुन पाेलिसांनी सुरक्षा दिली आहे.
आक्रमक नका होऊ...
प्रसार माध्यमातील चर्चेत आक्रमक राहणारे काही नेते आणि प्रवक्त्यांना शब्दांची निवड करताना विचार करण्याचा सल्ला देण्यात आला आहे. या नेत्यांत केंद्रीय मंत्री गिरिराज सिंह, अनंत हेगडे, साक्षी महाराज, संगीत सोम, टी. राजा, प्रताप सिम्हा आणि शोभा करंदलाजे यासारख्या नेत्यांचा समावेश आहे.
संयम राखावा...
सर्व प्रवक्त्यांना चर्चेला जाण्यासाठी संबंधित विषयावर भाजपच्या संशोधन विभागाने तयार केलेली सामग्री वाचण्याचे निर्देश दिले आहेत. संयम ढळू देऊ नये व अन्य धर्माच्या अनुयायींच्या भावना दुखावू नयेत.