यंदा ९ विधानसभा जिंकण्यासाठी भाजपचे ‘गुजरात मॉडेल’चे संकेत; काय आहे तयारी?
By ऑनलाइन लोकमत | Published: January 17, 2023 11:15 AM2023-01-17T11:15:00+5:302023-01-17T11:15:30+5:30
एकातही पराभूत व्हायचे नाही : पक्षाध्यक्ष नड्डा यांचे आवाहन
संजय शर्मा
नवी दिल्ली : भाजपने राष्ट्रीय कार्यकारिणीच्या पहिल्या दिवशीच आगामी लोकसभा निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ९ राज्यांतील विधानसभा निवडणुका जिंकण्यासाठी रणशिंग फुंकले. यातील एकाही निवडणुकीत पराभव पत्करायचा नाही, सर्व निवडणुकांमध्ये विजयाची नोंद करण्यासाठी सज्ज व्हा, असे आवाहन पक्षाध्यक्ष जे.पी. नड्डा यांनी केले. गुजरात मॉडेल इतर राज्यांमध्येही लागू केले जाईल, असे संकेतही त्यांनी दिले.
पंतप्रधान मोदी यांच्या नेतृत्वाखालील गुजरात विजयाचे अभिनंदन आणि कौतुक करणारा प्रस्तावही कार्यकारिणीत मांडण्यात आला. कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी दिल्लीत पंतप्रधान मोदींच्या ‘रोड शो’चे ठिकठिकाणी जोरदार स्वागत करण्यात आले.
तीन राज्यात सत्ता राखण्याचे आव्हान
त्रिपुरा, कर्नाटक, मध्य प्रदेश या तीन राज्यांमध्ये भाजपची सरकारे आहेत; तर मेघालय, नागालँडमध्ये भाजपच्या मित्रपक्षांची सरकारे आहेत. त्रिपुरा, कर्नाटक आणि मध्य प्रदेशातील सरकारे वाचविणे हे भाजपसमोर मोठे आव्हान आहे. तेलंगणाबाबत नड्डा म्हणाले, भाजप तेलंगणात संघर्ष करीत आहे; मात्र, निवडणुका जिंकण्यासाठी भाजप सर्व काही करेल.
२०२४ चा मूड
गुजरातमध्ये भाजपच्या प्रचंड विजयाचा संदर्भ देत किरेन रिजिजू यांनी आगामी २०२४ च्या लोकसभेसाठी देशातील जनतेचा मूड असल्याचे वर्णन केले.
काय आहे तयारी?
नड्डा यांनी अध्यक्षीय भाषणात ९ राज्यांचे मुख्यमंत्री, २ राज्यांचे उपमुख्यमंत्री, सर्व राष्ट्रीय कार्यकारिणींमध्ये उपस्थित ३५ केंद्रीय मंत्र्यांसह ३५० प्रतिनिधींना २०२४ च्या लोकसभा निवडणुकांची आतापासून तयारी करण्यास सांगितले. २०२४ पर्यंत भाजपला एकाही राज्यात निवडणूक हरायची नाही, असा निर्धारही त्यांनी व्यक्त केला. २०२३ मध्येच त्रिपुरा, मेघालय, नागालँड, कर्नाटक, मिझोराम, तेलंगणा, राजस्थान, मध्य प्रदेश, छत्तीसगड येथे विधानसभा निवडणुका आहेत.