दिल्लीत भाजपाची हॅट्ट्रिक
By admin | Published: April 27, 2017 02:18 AM2017-04-27T02:18:56+5:302017-04-27T02:18:56+5:30
भाजपाने दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांमध्ये १८१ जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा जोरदार यश मिळवले. भाजपाच्या
नवी दिल्ली : भाजपाने दिल्लीतील तिन्ही महानगरपालिकांमध्ये १८१ जागा जिंकून सलग तिसऱ्यांदा जोरदार यश मिळवले. भाजपाच्या विजयाला मतदान यंत्रांतील छेडछाड कारणीभूत असते असा वारंवार आरोप करणाऱ्या आम आदमी पक्षाला अवघ्या ४६ तर फक्त ३० जागा जिंकल्यामुळे काँग्रेसला तिसरे स्थान मिळाले. या पराभवाचे खापर आम आदमी पार्टीच्या नेत्यांनी पुन्हा एकदा मतदान यंत्रांवर फोडले आहे. तर काँगे्रसचे दिल्ली प्रदेश अध्यक्ष अजय माकन यांनी पराभवाची जबाबदारी स्वीकारत आपल्या पदाचा राजीनामा दिला.
एकूण २७० जागा असलेल्या या तिन्ही महानगरपालिका राखणे भाजपासाठी फार महत्त्वाच्या होत्या. २०१५मध्ये विधानसभा निवडणुकीत भरघोस यश मिळाल्यानंतर ‘आप’ला महापालिकाही जिंकण्याचे वेध लागले होते. भाजपासमोर आप साफ झाली. काँग्रेसच्या पुन्हा उभे राहण्याच्या आशाही धुळीस मिळाल्या. केजरीवाल यांनी तिन्ही महानगरपालिकांना सर्व सहकार्य करण्याचे आश्वासन दिले. हा पराभव केजरीवाल सरकारच्याविरोधात दिलेले मत असून मुख्यमंत्र्यांनी राजीनामा द्यावा, अशी मागणी विरोधकांनी केली.
नरेंद्र मोदी यांनी मानले आभार
भाजपावर पुन्हा विश्वास टाकल्याबद्दल व दिल्ली महानगरपालिका निवडणुकींतील जोरदार विजयाबद्दल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी बुधवारी दिल्लीतील मतदारांचे आभार मानले आहेत. भाजपावर विश्वास टाकल्याबद्दल मी दिल्लीच्या लोकांचा कृतज्ञ आहे, असे मोदी यांनी म्हटले.
बहुतेक मतदान यंत्रे ही चुकीच्या पद्धतीने काम करीत होती. ‘आप’ने दिल्लीत शिक्षण आणि आरोग्यासाठी एवढे काम केल्यानंतर मतदार भाजपाकडे जाणे शक्य नाही. - आशुतोष, ‘आप’चे नेते
कॉँग्रेसमध्ये परस्परांवर आरोपांची राळ उडवली जात आहे. मोठ्या पराभवाला माजी मुख्यमंत्री शीला दीक्षित यांनी माकन यांना थेट जबाबदार धरले आहे.