भाजपचे २०१८-१९चे उत्पन्न २,४१० कोटी
By ऑनलाइन लोकमत | Published: January 11, 2020 05:36 AM2020-01-11T05:36:10+5:302020-01-11T05:36:34+5:30
भारतीय जनता पक्षाचे वर्ष २०१८-२०१९ वर्षासाठीचे उत्पन्न २,४१० कोटी, तर २०१७-२०१८ वर्षात ते १,०२७ कोटी रुपये होते.
नवी दिल्ली : भारतीय जनता पक्षाचे वर्ष २०१८-२०१९ वर्षासाठीचे उत्पन्न २,४१० कोटी, तर २०१७-२०१८ वर्षात ते १,०२७ कोटी रुपये होते. उत्पन्न वाढीचा हा वेग तब्बल १३४ टक्के आहे. २०१८-२०१९ वर्षासाठीच्या आपल्या वार्षिक अंकेक्षण (आॅडिट) अहवालात भाजपने हे उत्पन्न घोषित केले असून निवडणूक आयोगाकडेही हा अहवाल सादर केला आहे. त्यात म्हटले आहे की, या उत्पन्नात १,४५० कोटी रुपये हे इलेक्टोरल बाँडस्द्वारे मिळालेले आहेत.
भाजपने २०१७-२०१८ वर्षात आम्हाला २१० कोटी रुपये इलेक्टोरल बाँडस्द्वारे मिळाल्याचे म्हटले होते. २०१८-२०१९ वर्षात एकूण खर्च हा १००५ कोटी रुपये झाल्याचे पक्षाने म्हटले. २०१७-२०१८ वर्षात हा खर्च ७५८ कोटी रुपये होता. खर्चातील ही वाढ ३४ टक्के आहे.
काँग्रेसला २०१८-२०१९ वर्षात ९१८ कोटी रुपयांचे उत्पन्न मिळाले, तर ४७० कोटी रुपये खर्च झाला, असे अंकेक्षण अहवालात म्हटले आहे. हा अहवाल निवडणूक आयोगाच्या संकेतस्थळावर उपलब्ध आहे. २०१८-२०१९ वर्षात काँग्रेसला ३८३ कोटी रुपये इलेक्टोरल बाँडस्द्वारे मिळाले. २०१७-२०१८ वर्षात काँग्रेसला या बाँडस्द्वारे अवघे पाच कोटी रुपये मिळाले होते.
>काय म्हटले आहे तपशिलात?
वर्ष २०१८-२०१९ वर्षासाठीचा वार्षिक उत्पन्न व खर्चाचा तपशील भाजपने ३१ मार्च, २०१९ रोजी दाखल केला असून त्यात २,४१० कोटी रुपये शुल्क आणि वर्गणीतून (१.८९ कोटी रुपये) मिळाले आहेत. ऐच्छिक योगदान (इलेक्टोरल बाँडस्सह २३५४ कोटी रुपये), बँकेतून मिळालेले व्याज (५४ कोटी रुपये) आणि इतर उत्पन्न (२४ लाख रुपये).ऐच्छिक योगदानातून म्हणजे आजीवन सहयोग निधीतून २४.६४ कोटी रुपये, मोर्चे व बैठकांतून अनुक्रमे ६८ आणि ९३ लाख रुपये, इलेक्टोरल बाँडस्द्वारे १४५०.८९ कोटी आणि इतर योगदानातून ८७६.८७ कोटी रुपये मिळाल्याचे भाजपने म्हटले आहे.