2024 च्या विजयासाठी भाजपचा मेगा प्लॅन, प्रत्येक जागेसाठी मोठी तयारी; पण या नेत्यांना निवडणूक लढता येणार नाही!
By ऑनलाइन लोकमत | Published: December 26, 2023 03:26 PM2023-12-26T15:26:16+5:302023-12-26T15:28:32+5:30
महत्वाचे म्हणजे, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी भाजपने ‘अबकी बार 400 के पार’ अशी घोषणा दिली आहे.
आगामी 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयाची पताका फडकावण्यासाठी भारतीय जनता पक्षाने मेगा प्लॅनिंग केली आहे. यासाठी, प्रत्येक लोकसभा मतदार संघात एक लोकसभा प्रभारी आणि लोकसभा संयोजक बनवला जाईल. याशिवाय, पक्ष गेल्या तीन निवडणुकांचे बूथ स्तरावर विश्लेषण करेल, तसेच प्रत्येक राज्यात 3-4 लोकसभा जागा एकत्र करून एक क्लस्टर तयार करण्यात येईल. याच बरोबर, क्लस्टर प्रभारीही तयार केले जातील, असा निर्णय पक्षाने घेतला आहे.
न्यूज 18 ने दिलेल्या वृत्तानुसार, या निर्णयातील सर्वात मोठी गोष्ट म्हणजे, जो कुणी लोकसभा संयोजक बनेल, त्याला निवडणूक लढता येणार नाही. जिल्हा आणि प्रदेश पातळीवर ज्वॉइनिंग टीम तयार केली जाईल. याशिवाय, ज्या राज्यांत केवळ 4 अथवा 5 एवढ्याच लोकसभेच्या जागा आहेत, तेथे क्लस्टर तयार केले जाणार नाही. क्लस्टर प्रवासांतर्गत पक्षाध्यक्ष, गृहमंत्री आणि संरक्षण मंत्री बैठका घेतील. लोकसभा मतदारसंघांमध्ये प्रवास आणि बैठकीसाठी वरिष्ठ नेत्यांची बैठक होईल.
याशिवाय, विधानसभा मतदारसंघांमध्ये प्रवासासाठी राज्यांतील नेत्यांना जबाबदारी दिली जाईल. लोकसभा निवडणूक कार्यालय 30 जानेवारीच्या आधीच सुरू केले जातील. याच बरोबर, सोशल मीडियावरील प्रत्येक प्लॅटफॉर्म मजबूत करण्यासंदर्भात सूचना देण्यात आल्या आहेत. प्रत्येक राज्यात 50 ठिकाणी तरुण, महिला, एससी, एसटी सम्मेलन आयोजित करण्यात येतील.
महत्वाचे म्हणजे, 2024 मध्ये होणाऱ्या लोकसभा निवडणुकीत विजयासाठी भाजपने ‘अबकी बार 400 के पार’ अशी घोषणा दिली आहे. तसेच I.N.D.I.A. च्याही सातत्याने बैठका सुरू आहेत. मात्र, जागा वाटक आणि पीएम पदाच्या चेहऱ्यासंदर्भात कसल्याही प्रकारची घोषणा झालेली नाही.