पंतप्रधान मोदींच्या वाढदिवसानिमित्त भाजपचा मेगा प्लॅन; या खास योजनाही सुरू करणार!
By ऑनलाइन लोकमत | Published: September 15, 2023 10:31 PM2023-09-15T22:31:18+5:302023-09-15T22:32:02+5:30
केंद्र सरकारच्या वतीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत.
भारतीय जनता पक्षाने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या वाढदिवसानिमित्त मेगा प्लॅन आखला असून विशेष कार्यक्रमाचे आयोजन केले आहे. याअंतर्गत विविध सरकारी योजनांतील लाभार्थ्यांना एकत्र आणण्याची तयारी सुरू आहे. भाजपचे कार्यालय सचिव शिव शक्ती नाथ बक्षी यांनी शुक्रवारी यासंदर्भात माहिती देताना सांगितले की, पंतप्रधान आवास योजना, पीएम स्ट्रीट व्हेंडर आत्मनिर्भर निधी आणि आयुष्मान भारत योजनेसह विविध सरकारी योजनांचे लाभार्थ्यी 25 ते 50 च्या गटात घरांमध्ये अथवा मंदिरांमध्ये एकत्र येतील.
हे लोक यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या दीर्घायुष्यासाठी आणि चांगल्या प्रकृतीसाठी प्रार्थना करतील. बक्षी म्हणाले, कृपया सर्व खासदारांनी या कार्यक्रमांचे आयोजन करून त्यात सहभाग घ्यावा. आपल्याला प्रत्येक पॉवर सेंटरमध्ये किमान एका तरी कार्यक्रमाचे उद्दिष्ट ठेवायचे आहे.
अनेक कार्यक्रमांची योजना -
केंद्र सरकारच्या वतीने रविवारी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 73 वा वाढदिवस साजरा करण्यासाठी विविध कार्यक्रम आखण्यात आले आहेत. यात केंद्र सरकार आयुष्मान भव कार्यक्रमही सुरू करणार आहे. यात मुख्य आयुष्मान भारत योजनेचाही समावेश आहे. यात आर्थिक दृष्ट्या कमकुवत असलेल्या लोकांना सब्सिडीची सुविधा मिळते. याशिवाय, पंतप्रधान नरेंद्र मोदी 17 सप्टेंबरला विश्वकर्मा जयंतीनिमित्त कारागीर, शिल्पकार आणि पारंपरिक कामे करणाऱ्या कारागिरांना मदत म्हणून 'पीएम विश्वकर्मा' नावाने एक नवीन योजनाही सुरू करणार आहेत.
‘पीएम विश्वकर्मा’ योजनेंतर्गत काय मिळणार? -
सरकारने जारी केलेल्या एका निवेदनानुसार, या योजनेंतर्गत, संबंधित व्यक्तीला प्रशिक्षणादरम्यान रोज 500 रुपये मानधनही दिले जाणार आहे. नवी साधने खरेदी करण्यासाठी सरकार 15 हजार रुपयांची मदत करण्यात येणार आहे. कामगारांना 1 लाख रुपयांपर्यंतचे कर्ज दिले जाईल. एक लाखाच्या मदतीनंतर पुढील टप्प्यात केवळ 5 टक्के व्याजदराने 2 लाखांपर्यंतचे कर्ज उपलब्ध करून देण्यात येईल. याचवेळी सरकार ब्रँडिंग, ऑनलाइन मार्केट ॲक्सेस यासाठी मदत करेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या योजनेची घोषणा स्वतंत्र्यदिनाच्या दिवशी केली होती.