भाजपाचे मिशन यूपी!
By admin | Published: June 14, 2016 04:55 AM2016-06-14T04:55:00+5:302016-06-14T04:55:00+5:30
आसाम विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे.
अलाहाबाद : आसाम विधानसभा निवडणुकीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने देशातील सर्वात मोठे राज्य असलेल्या उत्तर प्रदेशची सत्ता मिळवण्याच्या दृष्टीने पावले टाकायला सुरुवात केली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासाठी हे मिशन उत्तर प्रदेशच असून, अलाहाबादमधील राष्ट्रीय कार्यकारिणीच्या निमित्ताने त्यावर शिक्कामोर्तबच करण्यात आले आहे.
कार्यकारिणीच्या बैठकीनंतर झालेल्या जाहीर सभेत नरेंद्र मोदी यांनी मिशन उत्तर प्रदेशची जणू अधिकृत घोषणा व सुरुवातच केली. या सभेत मोदी म्हणाले की, उत्तर प्रदेशनेच भाजपाला केंद्राची सत्ता दिली. ते ऋण फेडण्यासाठी आम्हाला उत्तर प्रदेशला विकासाच्या मार्गावर न्यायचे आहे. येथील भ्रष्टाचार, वशिलेबाजी आणि गलिच्छ राजकारण संपवण्याची इच्छा आहे. येणाऱ्या विधानसभा निवडणुकीत येथील जनतेने आम्हाला सत्ता दिली, तरच हे शक्य होईल. याच राज्याने देशाला पंतप्रधान आणि गृहमंत्री दिले आहेत. पाच वर्षांत इथे बदल घडवून दाखवू. तो क़रून दाखवला नाही, तर आम्हालाही लाथ मारून दूर करा. पण आधी संधी द्या. (वृत्तसंस्था)
उत्तर प्रदेशही विकासाच्या मार्गावर नेऊ
- समाजवादी पक्ष आणि बहुजन समाज पक्ष यांना पाळीपाळीने सत्ता देण्याचे येथील जनतेने बंद करा. राज्यात धर्मांधता, जातीयता वाढविणाऱ्या पक्षांना स्थान असता कामा नये.
- भ्रष्टाचार व वशिलेबाजी संपल्याशिवाय राज्य विकासाकडे वाटचाल करू शकणार नाही. त्यासाठी आम्हाला सत्ता द्या.
आम्ही गुजरात, राजस्थान, मध्य प्रदेश, महाराष्ट्र या राज्यांना जसे विकासाच्या मार्गावर नेले, तसेच इथेही करून दाखवू.
हाताला मिळेल काम!
केंद्राच्या अनेक योजनांचा उल्लेख करीत मोदी यांनी सांगितले की, आमचे सरकार आल्यानंतरच परकीय गंगाजळीमध्ये वाढ झाली, जे साठ वर्षांत झाले नव्हते, ते आम्ही अवघ्या दोन वर्षांत करून दाखवले आहे. उत्तर प्रदेश मागे राहण्यास सपा आणि बसपाच कारणीभूत आहेत. प्रादेशिक, संकुचित वृत्तीने उत्तर प्रदेश पुढे जाणार नाही. त्यांना घरी बसवून भाजपाकडे सत्तेची सूत्रे दिल्यास कृषी, उद्योग क्षेत्रांत राज्य पुढे जाईल आणि बेरोजगारांनाही मोठ्या प्रमाणात रोजगार मिळेल.