गुजरातसाठी भाजपाचे 'Mission 150'
By admin | Published: March 20, 2017 01:06 PM2017-03-20T13:06:58+5:302017-03-20T13:08:58+5:30
भाजपाचे आता पुढचे लक्ष्य गुजरात असणार आहे. गुजरातमध्ये ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टर्सवरुन भाजपाने तसे संकेत दिले आहेत.
Next
ऑनलाइन लोकमत
अहमदाबाद, दि. 20 - उत्तरप्रदेश जिंकल्यानंतर भाजपाचे आता पुढचे लक्ष्य गुजरात असणार आहे. गुजरातमध्ये ठिकठिकाणी लागलेल्या पोस्टर्सवरुन भाजपाने तसे संकेत दिले आहेत. ''यूपी में 325, गुजरात में 150'' या घोषणेसह पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शहा यांचे छायाचित्र असलेले पोस्टर्स गुजरातमधल्य महत्वाच्या शहरांमध्ये लागले आहे.
गुजरातमध्ये डिसेंबर महिन्यात विधानसभेच्या निवडणुका होणार आहेत. सध्या असलेल्या मोदी लाटेचा फायदा घेण्यासाठी भाजपा कदाचित लवकर निवडणुका घेऊ शकते असे काही जणांचे मत आहे. गुजरातमध्ये विधानसभेच्या 182 जागा आहे. भाजपाने 150 जागा जिंकण्याचे लक्ष्य ठेवले आहे.
सध्या देशात मोदी लाट आहे. लवकर निवडणुका होणार असतील तर, आम्ही सज्ज आहोत. आम्ही निश्चित 150 पेक्षा जास्त जागा जिंकू असे गुजरातचे मुख्यमंत्री विजय रुपानी यांनी एनडीटीव्हीला सांगितले. उत्तरप्रदेशनंतर गुजरातमध्ये मोदींची प्रतिष्ठा पणाला लागणार आहे. कारण गुजरात हे मोदींचे गृहराज्य आहे.
गुजरातमध्ये मागच्या 19 वर्षांपासून भाजपाची सत्ता आहे. पंतप्रधानपदी विराजमान होण्यापूर्वी मोदी चारवेळा गुजरातचे मुख्यमंत्री होते. मोदी दिल्लीत गेल्यानंतर गुजरातमध्ये पटेल आरक्षण आंदोलन पेटले. गुजरातमधील पटेल समाज भाजपाचा मुख्य मतदार आहे. पण सध्या हा समाज भाजपावर मोठया प्रमाणावर नाराज आहे. प्रस्थापित सरकार विरोधातील लाटेचाही भाजपाला सामना करावा लागत आहे. त्यामुळे यावेळची गुजरातची निवडणूक भाजपा आणि मोदी दोघांसाठी कसोटी असणार आहे.