राज्यसभेसाठी भाजपाचे मिशन जुलै

By admin | Published: May 9, 2016 03:22 AM2016-05-09T03:22:23+5:302016-05-09T03:22:23+5:30

भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी आखलेली महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी झाली, तर भाजपा येत्या जुलैमध्येच राज्यसभेतही सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला मागे टाकू शकेल.

BJP's mission for the Rajya Sabha is July | राज्यसभेसाठी भाजपाचे मिशन जुलै

राज्यसभेसाठी भाजपाचे मिशन जुलै

Next

हरीश गुप्ता,  नवी दिल्ली
भारतीय जनता पार्टीचे अध्यक्ष अमित शहा यांनी आखलेली महत्त्वाकांक्षी योजना यशस्वी झाली, तर भाजपा येत्या जुलैमध्येच राज्यसभेतही सर्वात मोठा पक्ष म्हणून काँग्रेसला मागे टाकू शकेल.
राज्यसभेत काँग्रेसचे सध्या ६५ सदस्य आहेत. गेल्याच आठवड्यात डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी व नवज्योत सिंग सिद्धू हे दोन नामनिर्देर्शित सदस्य पक्षात आल्याने या वरिष्ठ सभागृहात भाजपाची सदस्यसंख्या ४९ वर पोहोचली आहे. येत्या जुलैमध्ये १५ राज्यांमधून राज्यसभेच्या ५७ जागांसाठी द्वैवार्षिक निवडणूक झाल्यावर सदस्यसंख्येचे गणित नाट्यपूर्णरीत्या बदलण्याची शक्यता आहे. येत्या जुलैमध्ये काँग्रेसचे १४ राज्यसभा सदस्य निवृत्त होत आहेत व द्वैवाषिक निवडणुकीत कर्नाटकमधून दोन, तर छत्तीसगढ, महाराष्ट्र, पंजाब आणि उत्तर प्रदेशातून प्रत्येकी एक असे काँग्रेसचे फक्त सहा सदस्य निवडून येतील, असे त्या-त्या राज्यांच्या विधिमंडळांमधील पक्षनिहाय बलाबलावरून दिसते. उत्तराखंडमधील एका जागेचे भवितव्य अपक्ष व इतरांच्या हाती असेल. अशा प्रकारे जुलैमध्ये काँग्रेसची सदस्यसंख्या सध्याच्या ६५ वरून ५७ पर्यंत खाली येईल.
दुसरीकडे भाजपाचे राज्यसभेतील १३ सदस्य निवृत्त होत आहेत व १० राज्यांच्या विधानसभांमधून त्यांचे १८ सदस्य राज्यसभेवरून निवडून येऊ शकतात, अशी स्थिती आहे. विधानसभांमधील पक्षीय बलाबल पाहता, राजस्थानमधील सर्व चार व मध्य प्रदेशातील सर्व तीन जागा भाजपा जिंकू शकते. महाराष्ट्रातही यापैकी तीन जागा जिंकण्याएवढे संख्याबळ भाजपाकडे आहे. अशा प्रकारे द्वैवार्षिक निवडणुकीनंतर राज्यसभेतील भाजपाचे सदस्य ५४ होतील. उत्तराखंडमधील जागाही जिंकली, तर भाजपा राज्यसभेत ५५ वर पोहोचेल. याशिवाय, स्वपन दास गुप्ता आणि सुरेश गोपी या दोन नामनिर्देशित सदस्यांनी पक्षात यावे, यासाठी भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. त्यात यश आले, तर भाजपा राज्यसभेत किमान ५६वर तरी नक्कीच पोहोचेल. डॉ. नरेंद्र जाधव आणि एम. सी. मेरी कोम हे आणखी दोन अलीकडेच नामनिर्देशित झालेले सदस्य आहेत, पण त्यांना भाजपामध्ये जाण्यात रस नाही, पण डॉ. प्रणव पंड्या यांच्या जागी नामनिर्देशित होणारे सातवे सदस्य भाजपात सामील होऊ शकतात. तसे झाले, तर द्वैवार्षिक निवडणुकीनंतर भाजपा व काँग्रेसची सदस्यसंख्या समसमान म्हणजे प्रत्येकी ५७ होईल.
> आठवलेंना मंत्रिपदाचे गाजर
अधिकृतपणे असेही समजते की, रिपब्लिकन पार्टी आॅफ इंडिया (आठवले) यासारख्या काही लहान पक्षांनी आपल्यामध्ये विलिन व्हावे, यासाठीही भाजपाचे प्रयत्न सुरू आहेत. रामदास आठवले केंद्रात मंत्री होण्याची मनिषा उरात बाळगून आहेत व दलित मतांवर डोळा ठेवून भाजपाही आठवलेंना मंत्रिपदाची बक्षिशी देईल, असे दिसते. स्वत: आठवले यांनी मात्र, याच अद्याप कोणताही औपचारिक प्रतिसाद दिलेला नाही. डॉ. नरेंद्र जाधव यांना राज्यसभेवर नामनिर्देशित करण्यामागे दलित मतांचेच गणित होते. अशाच प्रकारे केवळ एकच सदस्य असलेल्या इतरही काही पक्षांना आपल्यात विलिन करून घेण्यासाठी भाजपाची चाचपणी सुरू आहे, पण अद्याप त्यात त्यांना यश आलेले नाही.

> कार्यकारिणीच्या बैठकीपूर्वी भाजपा पक्ष संघटनेत मोठ्या फेरबदलाची शक्यता
नवी दिल्ली : भाजपाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक येत्या ११ व १२ जून रोजी आयोजित केली जाण्याची शक्यता आहे. या बैठकीपूर्वी पक्षाध्यक्ष अमित शाह हे पक्षसंघटनेत मोठा फेरबदल करण्याची शक्यता आहे, अशी माहिती पक्षाच्या सूत्रांनी दिली. येत्या ११ आणि १२ जून रोजी पक्षाच्या राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक होण्याची शक्यता आहे. या आधी कार्यकारिणीची बैठक १९-२० मार्च रोजी नवी दिल्लीत घेण्यात आली होती. दर तीन महिन्यांतून एकदा राष्ट्रीय कार्यकारिणीची बैठक व्हावी, अशी पक्षाच्या घटनेत तरतूद आहे, परंतु त्याचे काटेकोरपणे पालन केले जात नाही. या आधीची बैठक किमान एक वर्षानंतर घेण्यात आली होती, असे या सूत्रांनी सांगितले. आगामी बैठक अतिशय महत्त्वाची ठरणार आहे. कारण पक्षाध्यक्ष अमित शाह हे या बैठकीपूर्वी पक्ष संघटनेत मोठा फेरबदल करतील, असे सांगितले जाते.
> रिकाम्या होणाऱ्या जागांचे गणित
राज्य जागा काँग्रेस भाजपा इतर पक्ष
आंध्र प्रदेश ४ २ १ १ (तेलगू देसम )
बिहार ५ ० ० ५ (जदयू)
छत्तीसगढ २ १ १ ०
हरियाणा २ ० २ ०
झारखंड २ १ १ ०
कर्नाटक ४ १ २ १ (अपक्ष)
मध्य प्रदेश ३ १ २ ०
महाराष्ट्र ६ २ १३ (राष्ट्रवादी-२, सेना १)
ओडिशा ३ ० ० ३ (बिजद)
पंजाब २ १ ० १ (आकाली दल)
राजस्थान ४ २ १ १ (अपक्ष)
तामिळनाडू ६ १ ० ५ (द्रमुक-२,अण्णाद्रमुक-३)
तेलंगण २ १ ० १ (तेलगू देसम)
उत्तराखंड १ ० १ ०
उत्तर प्रदेश ११ १ १ ९ (बसपा-६, सपा-३)

Web Title: BJP's mission for the Rajya Sabha is July

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.