काल झालेले मतदान, आज भाजपा उमेदवाराचे निधन; निवडणुकीवर परिणाम होणार?
By ऑनलाइन लोकमत | Published: April 20, 2024 10:59 PM2024-04-20T22:59:29+5:302024-04-20T23:20:08+5:30
मुरादाबादमध्ये शुक्रवार, १९ एप्रिलला मतदान झाले आहे. मतदानानंतर ते तपासणी करण्यासाठी एम्समध्ये गेले होते.
भाजपाचे माजी खासदार आणि मुरादाबाद लोकसभा मतदारसंघाचे उमेदवार कुंवर सर्वेश सिंह (72) यांचे आज निधन झाले. दिल्लीच्या एम्समध्ये त्यांच्या गंभीर आजारावर उपचार सुरु होते. मुरादाबादमध्ये शुक्रवार, १९ एप्रिलला मतदान झाले आहे. मतदानानंतर ते तपासणी करण्यासाठी एम्समध्ये गेले होते. तिथेच त्यांना दाखल करून घेण्यात आले होते, असे त्यांच्या पीएने सांगितले.
सिंह यांच्यावर रविवारी अंत्यसंस्कार केले जाणार आहेत. यासाठी उत्तर प्रदेशचे प्रदेशाध्यक्ष उपस्थित राहणार आहेत. त्यांना प्रदीर्घ आजाराने ग्रासले होते. निवडणूक असल्याने त्यांनी मतदानानंतर तपासणी करण्यासाठी जाण्याचा निर्णय घेतला होता. परंतु, मतदानाच्या दुसऱ्याच दिवशी त्यांचा मृत्यू झाला.
कुंवर सर्वेश कुमार सिंह हे ठाकुरद्वारा विधानसभा मतदारसंघातून पाच वेळा आमदार झाले होते. २०१४ मध्ये ते खासदार झाले होते. २०१९ मध्ये त्यांना सपाच्या एसटी हसन यांनी पराभूत केले होते. आता पुन्हा ते २०२४ मध्ये निवडणूक लढवत होते.
निवडणुकीचे काय होणार...
सिंह यांच्या मृत्यूची माहिती जिल्हाधिकाऱ्यांना देण्यात आली असून त्यांनी निवडणूक प्रक्रियेवर याचा काही परिणाम होणार नसल्याचे स्पष्ट केले आहे. मतमोजणी ठरलेल्या दिवशी केली जाणार आहे. जर सिंह हे विजयी ठरले तर पोट निवडणूक घेतली जाणार आहे. त्यांचा पराभव झाला तर काहीही फरक पडणार नाही, असे जिल्हाधिकाऱ्यांनी स्पष्ट केले आहे.