केरळमधल्या महापालिका, ग्रामपंचायतींमध्ये भाजपाची मुसंडी
By admin | Published: November 7, 2015 03:11 PM2015-11-07T15:11:38+5:302015-11-07T15:11:38+5:30
आत्तापर्यंत डाव्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीने दमदार पाऊल टाकल्याचे ताज्या निवडणुकांवरून दिसत आहे
Next
>ऑनलाइन लोकमत
तिरुवनंतपूरम, दि. ७ - आत्तापर्यंत डाव्यांचा बालेकिल्ला राहिलेल्या केरळमधल्या स्थानिक स्वराज्य संस्थांमध्ये भारतीय जनता पार्टीने दमदार पाऊल टाकल्याचे ताज्या निवडणुकांवरून दिसत आहे. शनिवारी जाहीर झालेल्या निकालांमध्ये राजधानी तिरुवनंतपूरमच्या महापालिकेतल्या १०० जागांपैकी भाजपाने तब्बल ३५ जागा जिंकल्या आणि महापालिकेमध्ये दुस-या क्रमांकाच्या पक्षाचे स्थान पटकावले.
मार्क्सवादी कम्युनिस्ट पार्टीचा वरचश्मा असलेल्या या महापालिकेत या निवडणुकीपूर्वी भाजपाचे केवळ ६ नगरसेवक होते. यापूर्वी केवळ तिरुवनंतपूरम व अर्नाकुलम या दोनच पालिकांमध्ये प्रतिनिधीत्व असलेल्या भाजपाने आता कन्नूर वगळता सगळ्या पालिकांमध्ये प्रतिनिधीत्व मिळाल्याचे आजच्या निकालावरून दिसून आले आहे.
कोल्लम व अर्नाकुलममध्ये भाजपाने प्रत्येकी दोन जागा जिंकल्या आहेत. तर थ्रिसूर व कोझिकोडे येथील पालिकांमध्ये अनुक्रमे ६ व ७ जागी कमळ फुलले आहे.
आत्तापर्यंत हाती आलेल्या निकालांनुसार ग्रामीण भागातल्या एका पालिकेमध्ये व १४ ग्रामपंचायतींमध्ये भाजपाने वर्चस्व मिळवले असून हा ही एक विक्रमच आहे. आत्तापर्यंत कासारगोडू वगळता एकाही ग्रामपंचायतीमध्ये भाजपाला बहुमत मिळाले नव्हते.
राज्यात डाव्या पक्षांनी अल्पसंख्याकांचे लांगूलचालन केल्यामुळे मतदारांचा भ्रमनिरास होत असून त्याचा परिणाम भाजपाला यश मिळण्यात झाल्याचे भाजपाचे प्रदेशाध्यक्ष व्ही. मुरलीधरन यांनी सांगितले.