भाजपाची राष्ट्रीय कार्यकारणी जाहीर; विनोद तावडे, पंकजा मुंडे, विजया राहटकरांना पुन्हा संधी
By ऑनलाइन लोकमत | Published: July 29, 2023 11:35 AM2023-07-29T11:35:48+5:302023-07-29T11:36:40+5:30
भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे.
नवी दिल्ली – भाजपाने पक्षाच्या बहुप्रतिक्षित संघटनात्मक पुनर्रचनेत, आज राष्ट्रीय कार्यकारिणीच्या नवीन केंद्रीय पदाधिकाऱ्यांची घोषणा केली, ज्यात नऊ महिला आणि दोन मुस्लीम नेत्यांचा समावेश आहे. पक्षाचे सरचिटणीस आणि केंद्रीय कार्यालयाचे प्रभारी अरुण सिंह यांनी आज सकाळी ही यादी जाहीर केली ज्यात १३ राष्ट्रीय उपाध्यक्ष, ८ राष्ट्रीय महासचिव, राष्ट्रीय संघटन सरचिटणीस, सह-संघटन महासचिव, १३ राष्ट्रीय सचिव, राष्ट्रीय कोषाध्यक्ष आणि सह- खजिनदार अशी रचना आहे. या पदाधिकाऱ्यांमध्ये ९ महिलांचा समावेश आहे. यावेळी राष्ट्रीय सरचिटणीसांमध्ये एकाही महिलेला स्थान मिळालेले नसून १३ राष्ट्रीय उपाध्यक्षांपैकी पाच आणि १३ राष्ट्रीय सचिवांपैकी चार महिला आहेत.
भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीत महाराष्ट्रातील तिघांना पुन्हा संधी देण्यात आली आहे. त्यात राष्ट्रीय महामंत्री म्हणून विनोद तावडे यांच्यावर जबाबदारी दिली आहे. तर राष्ट्रीय सचिव म्हणून महाराष्ट्रातून विजया रहाटकर, पंकजा मुंडे यांचाही कार्यकारणीत समावेश करण्यात आला आहे. नुकतेच पंकजा मुंडे यांनी राजकारणापासून २ महिने बाजूला होण्याचा निर्णय घेतला होता. त्यानंतर अनेक नेत्यांनी त्यांना पुन्हा पक्षात सक्रीय होण्याचे आवाहन केले होते. त्यानंतर आता भाजपाच्या केंद्रीय पातळीवरून पंकजा मुंडे यांच्यावर ही जबाबदारी टाकली आहे.
भाजपा राष्ट्रीय अध्यक्ष श्री @JPNadda ने निम्नलिखित केंद्रीय पदाधिकारियों के नामों की घोषणा की है- pic.twitter.com/oG7URwnu0Z
— BJP LIVE (@BJPLive) July 29, 2023
२ मुस्लीम चेहऱ्यांना राष्ट्रीय उपाध्यक्षपदाची जबाबदारी
छत्तीसगडचे माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार रमण सिंह, खासदार सरोज पांडे आणि लता उसेंडी, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री आणि विद्यमान आमदार वसुंधरा राजे, झारखंडचे रघुवर दास, मध्य प्रदेशचे सौदान सिंह, उत्तर प्रदेशचे खासदार लक्ष्मीकांत बाजपेयी, खासदार रेखा वर्मा आणि विधान परिषद सदस्य सदस्य तारिक मन्सूर, ओडिशाचे बैजयंत पांडा, तेलंगणाचे डीके अरुणा, नागालँडचे एम चौबा एओ आणि केरळचे अब्दुल्ला कुट्टी, प्रोफेसर तारिक मन्सूर, ज्यांना राष्ट्रीय उपाध्यक्ष बनवण्यात आले होते, ते AMU चे कुलगुरू राहिले आहेत. अब्दुला कुट्टी, तारिक मन्सूर हे २ मुस्लीम चेहरे भाजपाने कार्यकारणीत पुढे आणले आहेत.
जे.पी नड्डा यांच्या टीममधून ‘हे’ चेहरे वगळले
भाजपाच्या या राष्ट्रीय कार्यकारणीतून दोन नेत्यांना राष्ट्रीय सरचिटणीस आणि राष्ट्रीय उपाध्यक्ष पदावरून हटवण्यात आले आहे. कर्नाटकातील पराभवामुळे सीटी रवी यांची सरचिटणीस पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. त्याचबरोबर आसाममधील भाजपा खासदार दिलीप सैकिया यांनाही सरचिटणीस पदावरून दूर केले आहे. यासोबतच हरीश द्विवेदी यांची राष्ट्रीय सचिव पदावरून हकालपट्टी करण्यात आली आहे. उपाध्यक्ष दिलीप घोष आणि भारतीबेन श्याल यांचा नव्या कार्यकारणीत समावेश करण्यात आलेला नाही.