आगामी विधानसभा निवडणुकांसाठी भाजपाची नवी रणनीती; मुख्यमंत्रिपदाचा चेहरा बदलणार
By ऑनलाइन लोकमत | Published: April 7, 2022 09:56 PM2022-04-07T21:56:14+5:302022-04-07T22:06:18+5:30
विधानसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचं भाजपानं योजना बनवली
नवी दिल्ली - उत्तर प्रदेश, उत्तराखंड, गोवा आणि मणिपूरमध्ये दणदणीत विजय मिळवल्यानंतर भाजपाने(BJP) या वर्षाच्या अखेरीस आणि २०२३ मध्ये होणाऱ्या विधानसभा निवडणुकांचे नियोजन सुरू केले आहे. २०२३ मध्ये मध्य प्रदेश, छत्तीसगड आणि राजस्थानमध्ये होणाऱ्या निवडणुकीत पंतप्रधान नरेंद्र मोदी(Narendra Modi) भाजपचा चेहरा असतील. मात्र या निवडणुकीत भाजपाने मोठा बदल करण्याचा निर्णय घेतला आहे.
सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, या राज्यांमध्ये नव्या पिढीला पुढे आणण्याचे काम सुरू आहे. निवडणुकीनंतर मुख्यमंत्री म्हणून नवा चेहरा समोर येणार आहे. नोव्हेंबर २०२२ मध्ये गुजरात, हिमाचल आणि २०२३ मध्ये होणाऱ्या निवडणुकांसाठी भाजपाने संपूर्ण रणनीती तयार केली आहे. मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान हे सलग तीन वेळा मुख्यमंत्री होते. डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत चौहान यांच्या नेतृत्वात भाजपाला सत्ता मिळाली नाही. भाजपा काँग्रेसपासून काही जागांनी मागे राहिली, त्यामुळे मध्य प्रदेशमध्ये १७ डिसेंबर २०१८ रोजी कमलनाथ यांच्या नेतृत्वाखाली काँग्रेसचे सरकार स्थापन झाले.
दीड वर्षानंतर, भाजपाने राजकीय उलथापालथ घडवली आणि कमलनाथ सरकार पाडले, त्यानंतर मार्च २०२० मध्ये शिवराज सिंह चौहान चौथ्यांदा मुख्यमंत्री झाले. आता मध्य प्रदेशात नवे नेतृत्व घडवण्यासाठी भाजपा प्रयत्नशील आहे. शिवराजसिंह चौहान यांना केंद्राच्या राजकारणात केव्हाही आणले जाऊ शकते, त्यामुळे मध्य प्रदेशातील भावी पिढीसाठी नेतृत्व तयार होण्यास मदत होईल अशीही पक्षांतर्गत चर्चा आहे. शिवराज चौहान जोपर्यंत मध्य प्रदेशात आहेत, तोपर्यंत नवे नेतृत्व घडवणे शक्य होणार नाही. असं असलं तरी मध्य प्रदेश हे भाजपासाठी अत्यंत महत्त्वाचे राज्य आहे, जे त्यांना कोणत्याही परिस्थितीत गमावायचे नाही. ज्योतिरादित्य शिंदे यांनी भाजपामध्ये प्रवेश केल्यापासून त्यांची ताकद सातत्याने वाढत आहे. त्यांचा प्रत्येक समर्थक कोणत्या ना कोणत्या पदावर आहे.
रमण सिंह हे २००४ ते नोव्हेंबर २०१८ पर्यंत सलग तीन वेळा छत्तीसगडचे मुख्यमंत्री होते. डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत भाजपाला पराभवाला सामोरे जावे लागले होते. तेथे काँग्रेसचे सरकार स्थापन झाले. अशा स्थितीत भाजपला आता छत्तीसगडमध्ये एक नवा चेहरा आणायचा आहे, जो पक्षासाठी दीर्घ खेळी खेळू शकेल. त्यामुळे २०२३ पूर्वी भाजपा कोणताही नवा चेहरा आणणार नाही हेही निश्चित आहे. ज्यामुळे पक्षांतर्गत गटबाजी वाढणार आहे. अशा परिस्थितीत मोदींच्या नेतृत्वाखालीच विधानसभा निवडणुका होणार आहेत. निवडणुकीचा निकाल लागल्यानंतरच नवा चेहरा समोर येईल असं वृत्त दैनिक भास्करनं दिले आहे.
डिसेंबर २०१३ मध्ये प्रचंड बहुमताने राजस्थानमध्ये सरकार स्थापन करणाऱ्या भाजपला डिसेंबर २०१८ च्या विधानसभा निवडणुकीत वसुंधरा राजे यांच्या नेतृत्वाखाली पराभवाला सामोरे जावे लागले होते. सहा महिन्यांनी झालेल्या लोकसभा निवडणुकीत मोदींच्या नावावर भाजपला दणदणीत विजय मिळाला. भाजपने राज्यात २५ जागा काबीज केल्या होत्या. काँग्रेसला दारूण पराभवाला सामोरे जावे लागले. गेल्या दोन दशकांपासून राजस्थानमध्ये वसुंधरा भाजपावर वर्चस्व गाजवत आहेत, पण आता पक्ष राजस्थानमध्ये नव्या नेतृत्वाच्या शोधात आहे. वसुंधरा यांच्या समर्थकांकडून त्यांना मुख्यमंत्री म्हणून घोषित करण्याची मागणी सातत्याने केली जात आहे, मात्र राजस्थानमध्ये जाऊन केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांनीही २०२३ ची विधानसभा निवडणूक नरेंद्र मोदींच्या नेतृत्वाखालीच लढणार असल्याचे स्पष्ट संकेत दिले आहेत. याआधी भाजपानं गुजरात, उत्तराखंड, कर्नाटक आणि आसाममध्ये नेतृत्व बदल केले आहेत.