बिहारमध्ये भाजपाचा O प्लस प्लॅन; बदललेल्या समीकरणात नवी राजकीय खेळी
By ऑनलाइन लोकमत | Published: September 10, 2022 08:52 AM2022-09-10T08:52:48+5:302022-09-10T08:53:15+5:30
भाजपानं बराच काळ आरजेडीच्या पारंपारिक मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यात यश आलं नाही
पटना - बिहारमध्ये राजकीय समीकरणं बदलली आहेत. कालपर्यंत जे मित्र होते ते एकमेकांचे राजकीय शत्रू बनलेत. बदललेल्या राजकीय समीकरणात प्रत्येक क्षणी काही ना काही नवं घडत आहेत. त्यात भाजपानंबिहारमध्ये प्लॅन 'O प्लस' वर काम करायला सुरुवात केली आहे. भाजपा KYM वगळता बिहारमध्ये रणनीती आखत आहे. जेणेकरून बिहारमध्ये ग्राऊंड लेव्हलला लालू प्रसाद यादव आणि नितीश कुमार यांना धक्का देण्याची तयारी आखली आहे. भाजपानं विनोद तावडे यांच्यावर प्रभारीपदाची जबाबदारी दिली आहे. त्यावरून बिहारमध्ये भाजपानं O प्लस प्लॅनवर कामाची सुरुवात झाली आहे.
काय आहे 'O प्लस प्लॅन'?
O प्लस प्लॅन काय आहे आणि भाजपा यावर काय काम करतेय असा विचार तुम्ही करत असाल. बिहारच्या सत्तेबाहेर झाल्यानंतर भाजपानं राजकीय खेळीही बदलण्याचा निर्णय घेतला आहे. राजकीय राजकारणात चेहरे बदलले आहेत. त्याची सुरुवात बिहार विधानसभा आणि विधान परिषदेत पाहायला मिळाली. विरोधी पक्षात आलेल्या भाजपानं विजय कुमार सिन्हा यांना नेते बनवून पक्षानं स्पष्ट संकेत दिलेत की, आता जुन्या चेहऱ्यांच्या भरवशाने राजकारण होणार नाही. सम्राट चौधरी यांना विधान परिषदेचे नेतेपद देऊन नितीश कुमारांच्या खेळीला उत्तर देण्याची तयारी भाजपानं आखली आहे. बिहारमध्ये आता नव्या चेहऱ्यांना पुढे आणून भाजपा राजकारण खेळणार आहे.
भाजपानं बराच काळ आरजेडीच्या पारंपारिक मतांमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न केला आहे. परंतु त्यात यश आलं नाही. रामकृपाल यादव, नित्यानंद राय, भूपेंद्र यादव यांच्यावर जबाबदारी दिली परंतु त्यातही म्हणावं तसं चांगली कामगिरी भाजपाला साध्य करता आली नाही. बिहारमध्ये भाजपानं ६५ वर काम करण्याचा निर्णय घेतला आहे. म्हणजे कुर्मी, यादव आणि मुस्लिम मतदारांवर(KYM) नजर ठेवणार आहे. २०२१ मध्ये भूपेंद्र यादव केंद्र सरकारमध्ये मंत्री बनल्यानंतर भाजपा प्रदेश प्रभारीपद रिक्त होते. शुक्रवारी विनोद तावडे यांची बिहार प्रभारीपदी नियुक्ती करण्यात आली. विनोद तावडे महाराष्ट्र भाजपाचे ज्येष्ठ नेते आहेत. तावडे हे देवेंद्र फडणवीस सरकारमध्ये मंत्री होते. अखिल भारतीय विद्यार्थी परिषदेच्या राष्ट्रीय महामंत्रीपदाची जबाबदारी त्यांनी सांभाळली होती.