भाजपातील ज्येष्ठांचा मोदींविरोधात फटाका

By admin | Published: November 11, 2015 03:04 AM2015-11-11T03:04:24+5:302015-11-11T03:04:24+5:30

‘सामूहिक अपयशा’च्या नावाखाली बिहारमधील दारुण पराभवाची जबाबदारी टाळू पाहणाऱ्या भाजपातील तरुण तुर्कांवर लालकृष्ण आडवाणी यांच्यासह पक्षातील बहुतेक म्हाताऱ्या अर्कांनी घणाघाती टीकेचा वार केला.

BJP's oldest fire brigade against Modi | भाजपातील ज्येष्ठांचा मोदींविरोधात फटाका

भाजपातील ज्येष्ठांचा मोदींविरोधात फटाका

Next

नवी दिल्ली : ‘सामूहिक अपयशा’च्या नावाखाली बिहारमधील दारुण पराभवाची जबाबदारी टाळू पाहणाऱ्या भाजपातील तरुण तुर्कांवर लालकृष्ण आडवाणी यांच्यासह पक्षातील बहुतेक म्हाताऱ्या अर्कांनी घणाघाती टीकेचा वार केला. निवडणुकीची जबाबदारी ज्यांच्यावर होती, त्यांनाच जबाबदार धरा, असा आग्रह धरत, पक्षातील ज्येष्ठांनी नरेंद्र मोदी आणि पक्षाध्यक्ष अमित शाह यांना लक्ष्य केले आहे. दिल्ली विधानसभा निवडणुकीतील पराभवानंतर पक्षाच्या नेत्यांनी कसलाही धडा घेतला नसल्याची टीकाही, मोदी पंतप्रधान झाल्यानंतर अडगळीत टाकल्या गेलेल्या ज्येष्ठांनी एका संयुक्त पत्रकाद्वारे केली आहे. परिणामी, बिहारचा पराभव जिव्हारी लागलेल्या भाजपात असंतोषाचे स्वर मंगळवारी रात्री कमालीचे तीव्र झाले.
लालकृष्ण आडवाणी, मुरली मनोहर जोशी, शांताकुमार आणि यशवंत सिन्हा यांनी बिहारमधल्या पराभवासाठी कुणालाच जबाबदार न धरल्याबद्दल आश्चर्य व्यक्त केले आहे, तसेच तटस्थ समिती नेमून पराभवासाठी कोण जबाबदार आहे, याचा शोध घ्यायला पाहिजे, असे एकपानी प्रसिद्धीपत्रकात म्हटले आहे. पराभवासाठी विशिष्ट कोणी जबाबदार नसून, ती सामूहिक जबाबदारी असल्याची भूमिका स्वीकारार्ह नाही, अशा कानपिचक्याही या ज्येष्ठांनी दिल्या आहेत. एकीकडे वाचाळवीरांना आवर घालण्याचे, तर दुसरीकडे ज्येष्ठांकरवी सुरू झालेला जाहीर पंचनामा रोखण्याचे दुहेरी आव्हान मोदी आणि शाह यांपुढे उभे ठाकले आहे.
दिल्लीमध्ये फज्जा उडूनही त्यावरून काहीच धडे घेतले नाहीत, हे बिहारच्या निकालांवरून दिसते.
बिहारमधील पराभवास सर्वच जबाबदार आहेत, असे म्हणणे म्हणजे कोणालाही जबाबदार न धरणे आहे. बिहारमध्ये पक्ष जिंकला असता, तर त्याचे श्रेय ज्यांनी घेतले असते, ते पक्षाच्या दारुण पराभवाची जबाबदारी स्वीकारायला तयार नाहीत, हाच याचा अर्थ होतो.
गेल्या वर्षभरात पक्षाचा ज्या पद्धतीने शक्तिपात केला गेला, तेच या ताज्या पराभवाचे प्रमुख कारण आहे. पराभव का झाला, काही मूठभर लोकांच्या मागे पक्षाला का फरफटवले गेले व पक्षातील सर्वसहमतीची परंपरा कशी नष्ट केली गेली, याचा सर्वंकष फेरविचार व्हायला हवा आणि ज्यांनी बिहारमध्ये पक्ष प्रचाराची धुरा सांभाळली व जे प्रचाराला जबाबदार होते, त्यांनी हा फेरविचार करता कामा नये.
आतषबाजी सुरू झाली...
दिवाळीच्या पूर्वसंध्येला खरी आतषबाजी सुरू झाली आहे. आश्चर्य वाटण्याजोगे काही नाही, असे टिष्ट्वट काँग्रेस नेते पी. चिदंबरम यांनी केले.
सध्या ज्यांच्या हातात पक्षातील सगळी सूत्रे एकवटली आहेत, त्या शाह व मोदींना योग्य तो संदेश जाईल, याची व्यविस्थत काळजी यामध्ये घेण्यात आली आहे. मूठभरांच्या हाती सारी सत्ता एकवटल्याबद्दलची नाराजी या चारही नेत्यांनी लपविलेली नाही. या ज्येष्ठांनी मंगळवारी एकत्र येत, बिहारच्या पराभवाची मीमांसा केली व आपली भूमिका पक्षाच्या व्यासपीठाऐवजी थेट प्रसिद्धी माध्यमांपुढे मांडली. या धुरिणांनी कुणाचे नाव नमूद केले नसले, तरी त्यांचा रोख मोदी व शाह यांवर होता.
पत्रक आधीच फुटले?
या पत्रकावर ११ नोव्हेंबर अशी पुढची तारीख आहे. तारीख चुकीची लिहिली गेली की, मोदी परदेश दौऱ्यावर जाण्याआधी पत्रक एक दिवस आधीच मुद्दाम ‘फोडले गेले’ हे स्पष्ट झाले नाही.

Web Title: BJP's oldest fire brigade against Modi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.