‘बळजबरीच्या धर्मांतरास भाजपाचा विरोध’
By admin | Published: December 21, 2014 02:22 AM2014-12-21T02:22:01+5:302014-12-21T02:22:01+5:30
बळजबरीच्या धर्मांतरास भाजपाचा पूर्णपणे विरोध असल्याची स्पष्टोक्ती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे दिली़
कोची : धर्मांतराच्या मुद्यावर संसदेत विरोधकांनी चालवलेली कोंडी आणि त्यामुळे सरकारची मलिन होत असलेली प्रतिमा या पार्श्वभूमीवर, बळजबरीच्या धर्मांतरास भाजपाचा पूर्णपणे विरोध असल्याची स्पष्टोक्ती पक्षाध्यक्ष अमित शहा यांनी शनिवारी येथे दिली़
देशात धर्मांतरविरोधी कायद्याची गरज अधोरेखित करतानाच, या कायद्यास स्वत:ला धर्मनिरपेक्ष म्हणणाऱ्या राजकीय पक्षांनी पाठिंबा द्यावा, असे आवाहनही त्यांनी केले़
केरळच्या दोनदिवसीय यात्रेच्या समारोपप्रसंगी ते पत्रकारांशी बोलत होते़ बळजबरीने धर्मांतर करण्यास विरोध करणारा भाजपा देशातील एकमेव पक्ष आहे.तथाकथित धर्मनिरपेक्ष राजकीय पक्षांनी धर्मांतरविरोधी कायद्याच्या समर्थनार्थ पुढे यावे, असे शहा यावेळी म्हणाले़ भाजपा या मुद्यावर अल्पसंख्याक संघटनांशी चर्चा करण्यास तयार आहे का? असे विचारले असता, या विषयावर राजकीय पक्ष सहमत झाले तरच सार्वजनिक चर्चा होऊ शकते, असे ते म्हणाले़ उत्तर प्रदेशात एका हिंदुत्ववादी संघटनेच्या ‘घर वापसी’ कार्यक्रमाबाबत विचारले असता, हे प्रकरण न्यायालयासमक्ष आहे़ न्यायालय कुठलाही निर्णय देत नाही, तोपर्यंत मी यावर कुठलीही प्रतिक्रिया देणार नाही, असे त्यांनी स्पष्ट केले़
भाजपा देशात जातीय आधारावर फूट पाडू इच्छित आहे, हा काँग्रेस उपाध्यक्ष राहुल गांधी यांचा आरोप त्यांनी यावेळी धुडकावून लावला़
(वृत्तसंस्था)
मोदींनी भूमिका स्पष्ट करावी, केजरीवाल यांची मागणी
नवी दिल्ली : बळजबरीने धर्मांतर करण्याच्या मुद्यावर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आपली भूमिका स्पष्ट करावी़ जनतेला या मुद्यावरील त्यांची भूमिका कळायला हवी, अशी मागणी आम आदमी पार्टीचे प्रमुख अरविंद केजरीवाल यांनी शनिवारी येथे केली.