LokSabha Bypoll Results 2018 : भाजपासाठी पोटनिवडणुका ठरताहेत डोकेदुखी; चार वर्षांत जिंकल्या फक्त चार जागा
By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2018 03:33 PM2018-05-31T15:33:57+5:302018-05-31T15:39:40+5:30
देशातल्या 11 राज्यांमध्ये चार लोकसभा आणि 10 विधानसभांच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही.
नवी दिल्ली- देशातल्या 11 राज्यांमध्ये चार लोकसभा आणि 10 विधानसभांच्या जागेसाठी पोटनिवडणूक घेण्यात आली. या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला फारशी चमक दाखवता आलेली नाही. गेल्या काही दिवसांपूर्वी पोटनिवडणुकांऐवजी राज्यातील निवडणुका जिंकणं महत्त्वाचं असल्याचं अमित म्हणाले होते. परंतु पोटनिवडणुकीतून सत्ताधारी पक्षाची ताकद दिसत असते. या वर्षी मार्च महिन्यात उत्तर प्रदेशातल्या पोटनिवडणुकांमध्येही भाजपाला मोठा धक्का बसला होता.
मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांचा प्रभाग गोरखपूर आणि उपमुख्यमंत्री केशव प्रसाद मौर्य यांच्या अलाहाबाद इथल्या फुलपूर लोकसभेच्या पोटनिवडणुकांमध्ये भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. भाजपाला बिहारच्या अररिया लोकसभा निवडणुकीतही पराभव स्वीकारावा लागला होता. या जागेवर आरजेडीला पुन्हा एकदा विजय मिळाला होता. 2014च्या लोकसभा निवडणुकीतल्या ऐतिहासिक विजयानंतर चार वर्षांत भाजपाच्या कामगिरी खालावत चालली आहे. भाजपाला 2014पासून मार्च 2014पर्यंत 23 लोकसभा निवडणुकीतल्या फक्त चार जागांवर विजय मिळवणं शक्य झालं आहे.
2014पासून झालेल्या लोकसभा पोटनिवडणुकीत भाजपाला आतापर्यंत 5 जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसनं अमृतसर लोकसभा निवडणुकीत भाजपाला टक्कर देत घवघवीत मतांनी विजय मिळवला होता. गेल्या चार वर्षांत झालेल्या पोटनिवडणुकांत इतर पक्षांच्या तुलनेत काँग्रेसला सर्वाधिक जागांवर विजय मिळाला आहे. काँग्रेसपाठोपाठ भाजपा आणि तृणमूल काँग्रेसचा नंबर लागतो. या दोन्ही पक्षांनी गेल्या चार वर्षांतील पोटनिवडणुकांत चार-चार जागांवर विजय मिळवला आहे. 2014पासून ज्या 23 लोकसभेच्या जागांवर पोटनिवडणुका घेण्यात आल्या, त्यातील 10 जागा भाजपाकडे आधीपासून होत्या. त्या 10 जागांपैकी 6 जागांवर भाजपाला पराभवाचा सामना करावा लागला होता. तर 4 जागांवर विजय मिळवणं भाजपाला शक्य झालं होतं.
2015, 2017 आणि मार्च 2018मध्ये झालेल्या एकाही पोटनिवडणुकीत भाजपाला विजय मिळवता आलेला नव्हता. परंतु मे 2018मध्ये झालेल्या महाराष्ट्रातल्या पालघर पोटनिवडणुकीत भाजपानं विजय मिळवला आहे. भाजपानं बीड लोकसभा पोटनिवडणूक आणि गुजरातमधल्या वडोदराची जागा जिंकली होती. बीजेडीनं ओडिशातल्या कंधमालमधली जागा जिंकली होती. तर एसपीनं यूपीच्या मैनपुरी जागा स्वतःकडे ठेवली होती. टीआरएसनं आंध्र प्रदेशमधल्या मेढक जागेवर कब्जा मिळवला होता.