भाजपची राज्यसभेतील सदस्यसंख्या ९५ पर्यंत खाली; सात खासदार निवृत्त
By ऑनलाइन लोकमत | Published: May 5, 2022 12:31 PM2022-05-05T12:31:24+5:302022-05-05T12:32:01+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर राष्ट्रपतींना नव्याने शिफारशी करण्यावर विचार करतील, असे संकेत मिळत आहेत.
हरिश गुप्ता
नवी दिल्ली : २०१६ मध्ये राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केल्यानंतर भाजपमध्ये गेलेले छत्रपती संभाजीराजे बुधवारी राज्यसभेतून निवृत्त झाले असून, यानंतर सभागृहातील भाजपची सदस्यसंख्या ९५ पर्यंत खाली आली आहे. त्यांच्यापूर्वी मागील दोन आठवड्यांत सहा आणखी नामनिर्देशित खासदार निवृत्त झाले होते. राष्ट्रपतींनी नामनिर्देशित केलेल्या १२ खासदारांपैकी पाच जणांनी भाजपमध्ये प्रवेश केला होता व त्यापैकी चार जण निवृत्त झाले आहेत.
पंतप्रधान नरेंद्र मोदी तीन देशांच्या दौऱ्यावरून परतल्यानंतर राष्ट्रपतींना नव्याने शिफारशी करण्यावर विचार करतील, असे संकेत मिळत आहेत. छत्रपती संभाजीराजे यांच्याशिवाय राज्यसभेतून निवृत्त झालेले सहा खासदार पुढीलप्रमाणे आहेत - स्वपन दासगुप्ता (पत्रकार), रूपा गांगुली (चित्रपट), डॉ. नरेंद्र जाधव (महाराष्ट्र), एम. सी. मेरी कोम (क्रीडा), सुरेश गोपी (चित्रपट) आणि डॉ. सुब्रह्मण्यम स्वामी (राजकारण).
- हिंदुत्व आणि भाजपसाठी त्यांचे योगदान लक्षात घेऊन डॉ. स्वामी यांना पुन्हा नामनिर्देशित करावे, असा राष्ट्रीय स्वयंसेवक संघामध्ये विचारप्रवाह आहे.
- आगामी काही महिन्यांत होणाऱ्या उपराष्ट्रपतींच्या निवडणुकीत नवनियुक्त खासदार सहभाग नोंदवणार असल्यामुळे नामनिर्देशन प्रक्रियेला गती द्यावी लागणार आहे.
लवकरच द्वैवार्षिक निवडणुकांची अपेक्षा
सात रिक्त जागांशिवाय आणखी ९ जागा रिक्त असल्यामुळे राज्यसभेची एकूण सदस्यसंख्या जी २४५ असते, ती २२९ पर्यंत खाली आली आहे. या पोटनिवडणुकांबरोबरच येत्या जुलैमध्ये रिक्त होणाऱ्या ५५ जागांसाठी लवकरच द्वैवार्षिक निवडणुका घेतल्या जाण्याची अपेक्षा आहे