प. बंगालमध्ये भाजपच्या रथयात्रा, फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात होणार सुरुवात
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2021 02:31 AM2021-01-18T02:31:50+5:302021-01-18T07:08:21+5:30
सूत्रांनुसार राज्यात पाच विभागांतून सुरू होणाऱ्या या पाच यात्रा सर्व २९४ मतदारसंघांतून जातील. राज्यस्तरावर आणि केंद्रीय नेत्यांसोबत स्थानिक नेते यात्रांचे नेतृत्व करतील.
नितीन अग्रवाल -
नवी दिल्ली :पश्चिम बंगालमध्ये विधानसभा निवडणूक जिंकण्यासाठी भारतीय जनता पक्ष वेगवेगळी धोरणे आखत असून, जास्तीत जास्त लोकांपर्यंत पोहोचण्यासाठी व लोकांची मने जिंकण्यासाठी रथयात्रा काढणार आहे.
सूत्रांनुसार राज्यात पाच विभागांतून सुरू होणाऱ्या या पाच यात्रा सर्व २९४ मतदारसंघांतून जातील. राज्यस्तरावर आणि केंद्रीय नेत्यांसोबत स्थानिक नेते यात्रांचे नेतृत्व करतील. फेब्रुवारीच्या पहिल्या आठवड्यात रथयात्रा सुरू होऊन जवळपास महिनाभर चालतील आणि कोलकात्यात एकत्र सांगता होईल.
दिल्लीत राज्याच्या नेत्यांसोबत झालेल्या चर्चेनंतर केंद्रीय नेतृत्वाने या यात्रांना मंजुरी दिली. त्यानंतर यात्रांचा विस्तृत कार्यक्रम, त्यात सहभागी होणाऱ्या नेत्यांची नावे आणि यात्रेचा मार्ग ठरवण्याचे काम सुरू केले गेले आहे. पक्षाच्या वरिष्ठ पदाधिकाऱ्यांसोबत अनेक केंद्रीय मंत्रीही त्यात सहभागी होण्याची शक्यता आहे.
केंद्रीय गृहमंत्री अमित शहा आणि पक्षाचे अध्यक्ष जे. पी. नड्डा यांच्या नेतृत्वात झालेल्या बैठकीत बंगालमधील निवडणुकीत पक्षाच्या रणनीतीवर विचारमंथन झाले. जे. पी. नड्डा आणि अमित शहा दोन आठवड्यांत राज्यात कमीत कमी एका सभेत भाषण करतील.