‘मोदी मॅजिक’वर भाजपचा भरवसा पाच राज्यांतील निवडणुकीत विकासाच्या प्रचारावर भर

By ऑनलाइन लोकमत | Published: August 27, 2023 01:06 AM2023-08-27T01:06:18+5:302023-08-27T02:17:03+5:30

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक राज्यात गटबाजीने त्रस्त असलेल्या भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोणत्याही प्रकारची जोखीम उचलू इच्छित नाही.

BJP's reliance on the 'Modi magic' to focus on promoting development in state elections | ‘मोदी मॅजिक’वर भाजपचा भरवसा पाच राज्यांतील निवडणुकीत विकासाच्या प्रचारावर भर

‘मोदी मॅजिक’वर भाजपचा भरवसा पाच राज्यांतील निवडणुकीत विकासाच्या प्रचारावर भर

googlenewsNext

- संजय शर्मा 

नवी दिल्ली : भाजप पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या ‘मोदी मॅजिक’ला विजयाचा फॉर्म्युला मानत आहे. सर्व राज्यांत भाजप श्रेष्ठींनी निर्देश दिले आहेत की, संपूर्ण निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावर, त्यांच्या कामावर केंद्रित करून लढायची आहे. स्थानिक नेते व त्यांच्या कामांची जनतेला आठवणही द्यायची नाही.

नोव्हेंबरमध्ये होणाऱ्या मध्य प्रदेश, राजस्थान, छत्तीसगड, तेलंगणा व मिझोरामच्या विधानसभा निवडणुकांमध्ये प्रत्येक राज्यात गटबाजीने त्रस्त असलेल्या भाजपचे केंद्रीय नेतृत्व कोणत्याही प्रकारची जोखीम उचलू इच्छित नाही. त्यामुळे सर्व राज्यांना स्पष्ट निर्देश दिले आहेत की, संपूर्ण निवडणूक मोदींचे नेतृत्व व त्यांच्या केंद्र सरकारच्या गरीब कल्याण योजनांवरच लढायची आहे. स्थानिक नेत्यांचे ना नाव घ्यायचे आहे ना त्यांच्या कोणत्याही कामाचा उल्लेख करायचा आहे.

भाजपचे हे निर्देश म्हणजे मध्य प्रदेशचे मुख्यमंत्री शिवराज सिंह चौहान, राजस्थानच्या माजी मुख्यमंत्री वसुंधरा राजे व छतीसगडचे माजी मुख्यमंत्री रमण सिंह यांना धक्का असल्याचे समजले जात आहे. शिवराज सिंह सुमारे १७ वर्षांपेक्षा जास्त, वसुंधरा राजे दोन वेळा व रमण सिंह हेही १५ वर्षे मुख्यमंत्री राहिलेले आहेत. 

तिन्ही नेते आपापल्या राज्यांमध्ये आताही दावेदारी करीत आहेत. तिन्ही नेत्यांनी आपापल्या कार्यकाळात अनेक योजना आणल्या होत्या. त्यांचा उल्लेख ते निवडणुकीत करू इच्छित होते. परंतु संपूर्ण निवडणूक नरेंद्र मोदी यांच्यावरच केंद्रित असेल व निवडणुकीत अन्य कोणता मुद्दा उपस्थित होऊ नये, यासाठीही नेत्यांना सूचना देण्यात आल्या आहेत.

तेलंगणा व मिझोराममध्येही भाजप संपूर्ण निवडणूक नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वावरच लढणार आहे. प्रादेशिक नेत्यांना नरेंद्र मोदी यांचे नेतृत्व समोर ठेवण्यास सांगण्यात आले आहे. यामागचे कारण म्हणजे भाजपकडून करण्यात आलेल्या सर्वेक्षणचे सांगितले जात आहे. 
यात पंतप्रधान नरेंद्र मोदी या सर्व राज्यांत सर्वांत जास्त लोकप्रिय असल्याचा निष्कर्ष पुढे आला आहे. तथापि, हा भाजपचा प्रयोग कर्नाटक व हिमाचल प्रदेशमध्ये पूर्णपणे अयशस्वी ठरला आहे. आता या पाच राज्यांत मोदी मॅजिक किती चालेल, हे लवकरच दिसणार आहे.

ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात निवडणुकांची घोषणा
निवडणूक आयोगाच्या सूत्रांनी सांगितले की, ऑक्टोबरच्या दुसऱ्या आठवड्यात कधीही पाच राज्यांतील निवडणुकांच्या तारखांची घोषणा होऊ शकते. नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत व डिसेंबरच्या दुसऱ्या आठवड्यापर्यंत या सर्व राज्यांत नवी सरकारे स्थापन होतील. निवडणुकांच्या तारखा जाहीर करताना सणवारांच्या तारखाही लक्षात घ्याव्या लागत आहेत. दसरा, दिवाळी, छठ पूजेसह अनेक महत्त्वाचे सण या काळात येणार आहेत.

Web Title: BJP's reliance on the 'Modi magic' to focus on promoting development in state elections

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.