भाजपाचा ‘रिमोट’रा. स्व. संघाच्या हाती नाही, सरसंघचालक मोहन भागवत यांचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: January 19, 2020 04:27 AM2020-01-19T04:27:57+5:302020-01-19T04:28:29+5:30
जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित लोक संघात आहेत व त्यापैकी काहीजण राजकारणातही आहेत
मोरादाबाद : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचाराजकारणाशी काही संबंध नाही, असे सांगून भारतीय जनता पार्टीचा ‘रिमोट कंट्रोल’ संघाच्या हाती असल्याचा सरसंघचालक मोहन भागवत यांनी शनिवारी येथे इन्कार केला.
गेले चार दिवस येथे झालेल्या संघ शिक्षण समारोपास एका जाहीर सभेत बोलताना भागवत म्हणाले की, संघ ही राजकीय संघटना नाही व राजकारणाशी संघाचा काहीही संबंध नाही. देशातील नैतिक, सांस्कृतिक व मानवी मूल्ये वृद्धिंगत करण्यासाठी काम करणारी ती एक संघटना आहे. जीवनाच्या सर्व क्षेत्रांशी संबंधित लोक संघात आहेत व त्यापैकी काहीजण राजकारणातही आहेत, एवढेच.
भागवत असेही म्हणाले की, उच्च कोटीचे कित्येक बुद्धिवंत व समाज सुधारक हे संघाशी औपचारिकपणे संलग्न नाहीत, पण त्यांची आणि आमची विचारसरणी एकच आहे. या संदर्भात त्यांनी भूदान चळवळीचे नेते आचार्य विनोबा भावे व संघाचे संस्थापक गोळवलकर गुरुजी यांच्यातील घनिष्ट मैत्रीचे उदाहरण दिले.
मात्र एखादी विचारसरणी सर्वदूर पसरून सर्वमान्य होण्यासाठी सत्तेचेही महत्व आहे, असे सांगून भागवत यांनी सत्तेला बुद्धिमत्ता व आध्यात्माची जोड देण्याच्या स्वामी विवेकानंद यांच्या शिकवणुकीचे स्मरण दिले. हे लक्षात घेऊन सर्वांनी बलवान, समृद्ध व आरोग्यसंपन्न होण्यासाठी झटावे, असे त्यांनी आवाहन केले. (वृत्तसंस्था)
राज्यघटनेलाच बांधिलकी
संघाने सातत्याने राष्ट्रोध्दाराचे काम केल्याने १९२५ मध्ये मुठभर लोकांनी स्थापन केलेल्या संघाचा आज १.३ लाख शाखांच्या रूपाने देशभर विस्तार झाला आहे, असे सांगून सरसंघचालक म्हणाले की, राज्यघटनेच्या प्रस्तावनेतील तत्त्वांशी बांधिलकी ठेवून संघ काम करतो. व्यक्तिगत स्वार्थ बाजूला ठेवून देशासाठी काम करू इच्छिणाऱ्या प्रत्येकाचे संघात स्वागत आहे.
सुमारे एक तासाच्या भाषणात भागवत, देशात सध्या ज्यावरून काहूर माजले आहे. त्या सुधारित नागरिकत्व कायद्याखेरीज इतर अनेक विषयांवर सविस्तर बोलले.