राष्ट्रवादाच्या चर्चेत भाजपाची सरशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 26, 2016 11:48 PM2016-03-26T23:48:54+5:302016-03-26T23:48:54+5:30
केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रवादावरील वैचारिक संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा मानस जाहीर करताना या मुद्यावर भारतीय जनता पार्टीने (भाजप) पहिल्या टप्प्यात विजय संपादन
नवी दिल्ली: केंद्रीय अर्थमंत्री अरुण जेटली यांनी राष्ट्रवादावरील वैचारिक संघर्ष पुढेही सुरू ठेवण्याचा मानस जाहीर करताना या मुद्यावर भारतीय जनता पार्टीने (भाजप) पहिल्या टप्प्यात विजय संपादन केला असल्याचा दावा शनिवारी केला. आतापर्यंत जे लोक भारताविरुद्ध नारेबाजी करीत होते ते ‘भारत माता की जय’ म्हणत नसले तरी ‘जय हिंद’ ही घोषणा देण्यास बाध्य झाले आहेत, याकडे त्यांनी लक्ष वेधले.
हा मुद्दा अधिक तापविताना जेटली यांनी काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांच्यावरही लक्ष्य साधले. ते म्हणाले, काही लोक लाखो करोडो देशवासीयांचे प्रेरणास्थान ठरलेल्या सावरकरांच्या राष्ट्रवादावर प्रश्नचिन्ह उपस्थित करीत आहेत. एवढेच नाहीतर देश तोडण्याची भाषा करणाऱ्यांच्या कार्यक्रमांमध्येही सहभागी होत आहेत. राहुल गांधी यांनी दिल्लीच्या जवाहरलाल नेहरू विद्यापीठातील (जेएनयू) वादानंतर तेथील दौरा केला होता.
हे आमच्यापुढील फार मोठे वैचारिक आव्हान आहे. आम्ही हा एक सैद्धांतिक संघर्ष मानला पाहिजे, असे मत मांडताना जेटली यांनी सांगितले की, देशाविरुद्ध नारेबाजी करणारे लोक आता किमान जय हिंद म्हणण्यास तयार झाले आहेत आणि हा आमचा पहिला विजय आहे. भाजपाची विचारसरणी राष्ट्रवादाने प्रेरित आहे. परंतु आज देश तोडण्याची भाषा करणे म्हणजे अभिव्यक्ती स्वातंत्र्य मानले जात असून ही फारच विचित्र परिस्थिती आहे. कायदा अथवा राज्यघटनेत कुठेही याची परवानगी नाही. दुर्दैवाची बाब म्हणजे देशाच्या राजधानीत हे सर्व घडत आहे. जेटली दिल्ली भाजपा कार्यकारिणीच्या बैठकीत मार्गदर्शन करीत होते. (वृत्तसंस्था)
पक्ष कार्यकर्त्यांना अनुसूचित जाती जनजातीचे लोक आणि महिलांमध्ये जाण्याचे आवाहन करताना जेटली यांनी सांगितले की, सरकार येत्या काही दिवसातच स्टँडअप इंडिया योजना सुरू करणार आहे. याअंतर्गत बँकेच्या प्रत्येक शाखेतून अनुसूचित जाती जनजाती आणि महिलांना मोठे उपक्रम आणि उद्योग सुरू करण्यासाठी एक कोटी रुपयांपर्यत कर्ज दिले जाईल.