ओमर अब्दुल्लांना भाजपाने पाठविले रेजर; म्हणाले काँग्रेसची मदत घ्या!
By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2020 12:52 PM2020-01-28T12:52:03+5:302020-01-28T12:54:43+5:30
भाजपा रेजरच्या ट्वीटवरून ट्रोल होऊ लागताच तामिनाडूच्या ट्विटर हँडलवरून ते ट्वीट हटविण्यात आले आहे.
चेन्नई : जम्मू काश्मीरमध्ये शनिवारी टू जी इंटरनेट सेवा सुरू करण्यात आली. यानंतर माजी मुख्यमंत्री ओमर अब्दुल्ला यांचा दाढी वाढलेला फोटो सोशल मिडीयावर व्हायरल होऊ लागला होता. या फोटोवरून भाजपावर टीकाही होऊ लागली होती. आज तामिळनाडूच्या भाजपाने अब्दुल्लांची खिल्ली उडविताना त्यांना अॅमेझॉनवरून रेजर पाठविले आहे.
नागरिकत्व दुरुस्ती कायद्यावरून देशभरात सुरु असलेल्या आंदोलनाच्या पार्श्वभूमीवरुन आणि प्रजासत्ताक दिनाचं निमित्त साधत काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना संविधानाची प्रत अॅमेझॉनवरून भेट म्हणून पाठवली होती. मात्र, मोदी यांनी ती नाकारल्याचा स्क्रीनशॉट काँग्रेसने त्यांच्या ट्विटरवर शेअर केला होता. अशाच पद्धतीने भाजपाने ओमर अब्दुल्लांना दाढी करण्यासाठी ब्लेड नसेल म्हणून रेजर पाठविले आहे.
भाजपाने ट्वीटवर रेजरची ऑर्डर दिलेला स्क्रीनशॉट शेअर करताना म्हटले आहे की, प्रिय ओमर अब्दुल्ला, तुम्हाला अशा स्थितीत पाहणे निराशेचे आहे जेव्हा तुमचे अनेक भ्रष्ट लोक बाहेर मजा करत आहेत. कृपया ही भेट स्वीकारावी आणि कोणत्याही प्रकारची मदत लागली तर तुमचाच सहयोगी काँग्रेसशी संपर्क साधावा.
काँग्रेसने पाठवली खास भेट; पण पैसे भरावे लागणार नरेंद्र मोदींना
यापूर्वी भाजपाचे नेते गिरिराज सिंह यांनी अब्दुल्ला यांच्या दाढीवाल्या फोटोवरून खिल्ली उडविली होती. भाजपा रेजरच्या ट्वीटवरून ट्रोल होऊ लागताच तामिनाडूच्या ट्विटर हँडलवरून ते ट्वीट हटविण्यात आले आहे.