पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या वाढदिवसाला भाजपाचा ‘सेवा दिवस’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 18, 2017 01:40 AM2017-09-18T01:40:45+5:302017-09-18T01:40:55+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६७वा वाढदिवस स्वत: पंतप्रधानांनी साजरा केला नाही, पण भाजपाने हा दिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा केला. अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचे अभिष्टचिंतन केले.
नवी दिल्ली : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा ६७वा वाढदिवस स्वत: पंतप्रधानांनी साजरा केला नाही, पण भाजपाने हा दिवस ‘सेवा दिवस’ म्हणून साजरा केला. अनेक नेत्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून मोदींचे अभिष्टचिंतन केले.
भाजपाध्यक्ष अमित शाह यांनी खास ब्लॉग लिहून स्तुतिसुमनांचा वर्षाव केला. मोदी यांची तुलना सरदार वल्लभभाई पटेल आणि डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्याशी करून, शाह यांनी म्हटले आहे की, सरदार पटेल यांनी देशाची प्रादेशिक अखंडता अबाधित ठेवली. आंबेडकरांनी सामाजिक एकता प्रस्थापित केली, तर मोदींनी देशाच्या आर्थिक एकीकरणाचा पाया रचला. मोदी यांची गरिबांबाबतची जी संवेदनशीलता आहे, त्यामुळेच गरिबी निर्मूलनाचे ऐतिहासिक पाऊल आकार घेत आहे. भारताच्या इतिहासात प्रथमच असे होत आहे. नोटाबंदीनंतर विरोधक भलेही टीका करत असोत, पण या निर्णयामुळे पारदर्शकता वाढली आहे. शाह यांनी मुद्रा योजना, जनधन खाते, सर्जिकल स्ट्राइक आणि नोटाबंदी यांचा उल्लेख केला. केंद्रीय मंत्री निर्मला सीतारामन, मुख्तार अब्बास नक्वी, महेश शर्मा, हरदीप सिंह पुरी आणि अल्फोंस कन्नानथानम यांनी ‘स्वच्छता हीच सेवा’या उपक्रमात रविवारी सहभाग घेतला.
>आईचे आशीर्वाद घेतले
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी वाढदिवसानिमित्त रविवारी आई हीराबेन यांचे आशीर्वाद घेतले. सकाळी गांधीनगरच्या बाहेरील भागातील ‘वृंदावन बंग्लोज’ येथे आपल्या लहान भावाच्या निवासस्थानी मोदी दाखल झाले आणि आईचे आशीर्वाद घेतले. मोदी येथे २० मिनिटे होते.
नेत्यांनी दिल्या शुभेच्छा
राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांनी मोदी यांना वाढदिवसानिमित्त शुभेच्छा दिल्या. दीर्घायुष्य आणि राष्ट्राची सेवा करण्यासाठी शुभेच्छा असे टिष्ट्वट त्यांनी केले.
याशिवाय गृहमंत्री राजनाथ सिंह, काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी, अरुण जेटली, मनेका गांधी, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे, सुरेश प्रभू, नॅशनल कॉन्फरन्सचे नेते उमर अब्दुल्ला यांच्यासह अनेक राज्यांचे मुख्यमंत्री, भाजपाचे देशातील खासदार, आमदार, नेते आणि विरोधी पक्षातील अनेक नेत्यांनी चित्रपट व विविध क्षेत्रांतील दिग्गजांनी मोदी यांना शुभेच्छा दिल्या.