नोटाबंदीपूर्वीच भाजपाचे सहा लाख कोटी बँकेत
By admin | Published: December 27, 2016 04:29 AM2016-12-27T04:29:16+5:302016-12-27T04:29:16+5:30
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वीच आॅक्टोबरमध्ये भाजपने सहा लाख कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला
बारन : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नोटाबंदीची घोषणा करण्यापूर्वीच आॅक्टोबरमध्ये भाजपने सहा लाख कोटी रुपये बँकेत जमा केले आहेत, असा आरोप काँग्रेसचे उपाध्यक्ष राहुल गांधी यांनी केला आहे. राजस्थानमधील एका सभेत ते बोलत होते.
राहुल गांधी म्हणाले की, मोदी यांची नोटाबंदीची ही घोषणा काळ्या पैशांविरुद्ध नसून गरिबांविरुद्ध आहे. नोटाबंदीची घोषणा झाल्यानंतर भाजपच्या जनार्दन रेड्डींनी ५०० कोटी रुपये मुलीच्या विवाहासाठी खर्च केले. केंद्र सरकारने भ्रष्टाचाराविरुद्ध कोणताही कायदा आणला तरी त्याला आमचा पाठिंबाच राहील; पण मोदींचे धोरण हे काळ्या पैशांविरुद्ध नसून गरिबांविरुद्ध आहे.
राहुल गांधी म्हणाले की, काळा पैसा ६ टक्के रोख रकमेत आहे. उर्वरित जमिनीच्या स्वरूपात आणि स्वीस बँकेत जमा आहे. स्वीस बँकेने काळा पैसा ठेवणाऱ्या लोकांची यादी जर दिली आहे तर, मोदी ती सभागृहात का सांगत नाहीत. दरम्यान, राजस्थानच्या मुख्यमंत्री वसुंधरा राजे यांच्यावरही राहुल गांधी यांनी यावेळी टीका केली. ते म्हणाले की, राजस्थानात तीन वर्षांपासून वसुंधरा राजे यांचे सरकार आहे. या काळातील त्यांचे एक तरी काम सांगा. शेतकरी रोज आत्महत्या करीत आहे; पण सरकारचे याकडे दुर्लक्ष आहे, असेही ते म्हणाले.
महेश शहाशी मोदी, शहा यांचे काय संबंध आहेत?
नोटाबंदीसह इतर विषयांवर मंगळवारी काँग्रेसच्या पुढाकाराने होत असलेल्या विरोधी पक्षांच्या बैठकीआधी काँग्रेसने पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि भाजप अध्यक्ष अमित शाह यांच्यावर भ्रष्टाचाराच्या ताज्या आरोपांनी हल्ला केला. मोदी तसेच अमित शहा यांचे महेश शाह यांच्याशी नेमके काय संबंध आहेत, असा सवाल काँग्रेसने केला आहे.
नोटाबंदीचा निर्णय व्हायच्या आधीच उत्पन्न जाहीर करण्याच्या योजनेत महेश शाह यांनी १३,८६० कोटी रुपये बँकेत जमा केले होते व त्यांची आजपर्यंत चौकशी झालेली नाही, असे सांगून काँग्रेसचे नेते जयराम रमेश यांनी गुजरातचे माजी मुख्यमंत्री सुरेश मेहता यांनी केलेल्या खुलाशाचा हवाला दिला.
त्यात मेहता म्हणाले होते की महेश शाह हे गुजरात भाजपच्या नेत्यांच्या खूप जवळचे आहेत तसेच नरेंद्र मोदी आणि अमित शाह यांच्याशी त्यांचे घनिष्ठ संबंध आहेत.