लोकसभेच्या प्रचारासाठी भाजपाचं 'घोषवाक्य' ठरलं; 'या' एकाच वाक्यात सर्वकाही
By ऑनलाइन लोकमत | Published: January 2, 2024 05:02 PM2024-01-02T17:02:29+5:302024-01-02T17:13:09+5:30
२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे.
देशात लोकसभा निवडणुकांचे वारे वाहू लागले असून मार्च महिन्यात लोकसभा निवडणुकांची घोषणा होण्याची शक्यता आहे. त्यामुळे, सर्वच राजकीय पक्ष, आघाड्या, युती आणि अपक्षही कामाला लागले आहेत. लोकसभेच्या सार्वत्रिक निवडणूक अवघ्या काही महिन्यांवर आहेत. या निवडणुकीत विजय मिळवून सलग तिसऱ्यांदा देशाची सत्ता मिळवण्यासाठी भाजपानं मोर्चेबांधणी सुरू केली आहे. त्यासाठी आज पक्षाच्या मुख्यालयामध्ये एक उच्चस्तरीय बैठक झाली. त्यामध्ये, भाजपाच्या यंदाच्या निवडणुकीतील प्रचाराचं घोषवाक्य ठरलं आहे.
२२ जानेवारी रोजी अयोध्येमध्ये राम मंदिरामध्ये प्राणप्रतिष्ठापना सोहळा होणार आहे. या सोहळ्यानंतर पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या अनेक राज्यांमध्ये झंझावाती सभा होतील. याशिवाय केंद्रीय गृहमंत्री अमित शाह आणि भाजपाचे राष्ट्रीय अध्यक्ष जे.पी. नड्डा यांच्या देशव्यापी दौऱ्यांबाबतही चर्चा करण्यात आली. याच बैठकीत आगामी लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाच्या प्रचाराची दिशा आणि घोषवाक्यही ठरवण्यात आलं आहे. 'अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार' हे घोषवाक्य या निवडणुकीत असणार आहेत. भाजपाने यापूर्वीच्या निवडणुकांमध्येही घोषवाक्यांवर मोठा भर दिला होता.
सन २०१४ च्या निवडणुकीत भाजपाने, बहुत हो गई महंगाई की मार, अब की बार मोदी सरकार हे घोषवाक्य दिलं होतं. तर, २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत फिर एक बार मोदी सरकार हे घोषवाक्य घेऊन प्रचाराची रणनिती आखली होती. आता, मोदींच्या नेतृत्वात तिसऱ्यांच्या होत असलेल्या लोकसभा निवडणुकांसाठी भाजपाने आपलं घोषवाक्य निश्चित केलं आहे. 'अबकी बार 400 पार, तीसरी बार मोदी सरकार', हे घोषवाक्य निश्चित केलं आहे. त्यामुळे, भाजपाकडून एकप्रकारे प्रचाराचा नारळ फुटला आहे, प्रचाराचा शुभारंभ झालाय, असेच म्हणावे लागेल.
दरम्यान, भाजपाच्या आजच्या बैठकीतून मिळालेल्या माहितीनुसार, इतर पक्षातील नेत्यांना पक्षात घेण्याबाबत विचार करण्यासाठी भाजपाने जॉयनिंग समितीची स्थापना केली आहे. ही समिती ज्या नेत्यांच्या नावावर शिक्कामोर्तब करेल, त्यांनाच भाजपामध्ये प्रवेश दिला जाणार आहे. पार्टी मुख्यालयामध्ये झालेल्या बैठकीमध्ये केंद्रीय गृहमंत्री अमित शाह यांच्यासह राष्ट्रीय अध्यक्ष जेपी नड्डा यांच्यासह देशभरातील सुमारे १५० नेते सहभागी झाले होते.