भाजपची दक्षिणस्वारी लोकसभेसाठीच; प्रादेशिक पक्ष बलवान, गुलाल लागण्याची शक्यता कमी
By ऑनलाइन लोकमत | Published: March 28, 2021 05:59 AM2021-03-28T05:59:50+5:302021-03-28T06:00:08+5:30
केरळमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत तिरुवनंतपूरम मतदारसंघात भाजप उमेदवाराने शशी थरूर यांचा चांगलाच घामटा काढल्याने भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे.
पोपट पवार
तिरुवनंतपूरम : पश्चिम बंगाल, आसाम, पद्दुचेरी, केरळ आणि तामिळनाडू या पाच राज्यांतील विधानसभा निवडणुकीत भाजपने आपली सारी शक्ती पणाला लावली असली तरी दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडू या राज्यांमध्ये प्रादेशिक पक्ष बलवान असल्याने भाजपला येथे गुलाल लागण्याची सुतरामही शक्यता नाही. मात्र, विधानसभेच्या मैदानावरच लोकसभेची पेरणी करून भाजप दक्षिणेत आपले अस्तित्व आणखी मजबूत करण्याच्या तयारीत आहे. कर्नाटक वगळता दक्षिणेतील इतर राज्यांमध्ये भाजप अजूनही चाचपडत आहे. याचेच शल्य वारंवार बोचत असल्याने भाजप बंगाल आणि आसाम जिंकण्यासाठी ज्या ताकदीने रणांगणात उतरला आहे, त्याच ताकदीने दक्षिणेतील केरळ आणि तामिळनाडूतही जोर लावू पाहत आहे.
केरळमध्ये लोकसभेच्या निवडणुकीत तिरुवनंतपूरम मतदारसंघात भाजप उमेदवाराने शशी थरूर यांचा चांगलाच घामटा काढल्याने भाजपचा आत्मविश्वास कमालीचा दुणावला आहे. शबरीमाला प्रकरणाचा मुद्दा लावून धरत भाजपने येथे डावे आणि काँग्रेसच्या बरोबरीने तिसरा पर्याय निर्माण केला आहे. गत विधानसभा निवडणुकीत केवळ नेमम ही एकमात्र विधानसभेची जागा पदरात पडलेल्या भाजपने यंदाच्या निवडणुकीत दहा जागांवर डावे आणि काँग्रेसला कडवे आव्हान दिले आहे.
उत्तरेतील कसर दक्षिणेत भरून काढणार
२०१४ आणि २०१९ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपने उत्तर प्रदेश, बिहार, गुजरात, मध्यप्रदेश, छत्तीसगढ आणि राजस्थान या राज्यांमध्ये मोठे यश मिळवले होते. मात्र, वारंवार ही राज्ये साथ देतीलच याची शाश्वती नसल्याने भाजपने इतर राज्यांतही पर्याय धुंडाळण्याची तयारी सुरू केली आहे.
उत्तरेत अपेक्षित जागा मिळाल्या नाहीत तर त्यांची कसर दक्षिणेत यश मिळवून काढण्याची रणनीती भाजपने आखली आहे. त्यासाठी विधानसभा निवडणुकीत या राज्यांमध्ये ताकद लावून लोकसभेला काही जागा सेफ करण्याचा भाजपचा गेमप्लॅन आहे.