ये मोदी है... 'सर्जिकल स्ट्राइक डे' निमित्त भाजपाने जवानांसोबत थोपटली स्वतःची पाठ
By ऑनलाइन लोकमत | Published: September 29, 2018 12:11 PM2018-09-29T12:11:15+5:302018-09-29T12:11:28+5:30
'अभिमान पर्व' या हॅशटॅगसोबत भाजपाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या तयारीचे काही फोटोही आहेत. तसंच, प्रत्यक्ष सर्जिकल स्ट्राइकच्या रेकॉर्डिंगमधील दृश्यंही त्यात वापरण्यात आली आहेत.
नवी दिल्लीः नियंत्रण रेषा ओलांडून, पाकव्याप्त काश्मीरमध्ये शिरून दहशतवाद्यांचे तळ उद्ध्वस्त करण्याचा पराक्रम भारतीय जवानांनी २९ सप्टेंबर २०१६ रोजी केला होता. पाकिस्तानवरील या 'सर्जिकल स्ट्राइक'ला आज दोन वर्ष पूर्ण होत असताना, भाजपानं एक व्हिडीओ सोशल मीडियावर पोस्ट केला आहे. त्यात जवानांच्या कामगिरीचा गौरव करतानाच, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी आपली पाठही थोपटून घेतल्याचं दिसतंय.
'अभिमान पर्व' या हॅशटॅगसोबत भाजपाने शेअर केलेल्या या व्हिडीओमध्ये सर्जिकल स्ट्राइकच्या तयारीचे काही फोटोही आहेत. तसंच, प्रत्यक्ष सर्जिकल स्ट्राइकच्या रेकॉर्डिंगमधील दृश्यंही त्यात वापरण्यात आली आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी पाकिस्तानला दिलेल्या इशाऱ्यातील काही वाक्यंही व्हिडीओमध्ये पाहायला मिळतात.
'जब कोई आतंकवाद निर्यात करने का उद्योग बनाकर बैठा हो, युद्ध लड़ने की ताकत नहीं है, पीठ पर वार करने के प्रयास होते हैं, तो ये मोदी है... उसी भाषा में जवाब देना जानता है।', हे नरेंद्र मोदींच्या भाषणातील वाक्य व्हिडीओत वापरलंय. त्यातून भाजपाच्या आत्मस्तुतीचा प्रयत्न जाणवतो.
We salute the unmatched valour of our brave soldiers who conducted Surgical Strikes. #ParakramParvpic.twitter.com/KaeqIEJEDH
— BJP (@BJP4India) September 29, 2018
सप्टेंबर २०१६ मध्ये नियंत्रण रेषेजवळच्या उरी येथील भारताच्या लष्करी तळावर दहशतवाद्यांनी हल्ला केला होता. त्यात १७ जवान शहीद झाले होते. त्याचा बदला म्हणून भारतीय लष्करानं २९ सप्टेंबर २०१६ रोजी 'सर्जिकल स्ट्राइक' करून पाकिस्तानला इंगा दाखवला होता आणि जगापुढे त्यांना उघडं पाडलं होतं.