उत्तर प्रदेशमध्ये येणार भाजपचं राज्य- सर्व्हे

By admin | Published: October 12, 2016 11:37 PM2016-10-12T23:37:03+5:302016-10-12T23:37:03+5:30

उत्तर प्रदेशमध्ये 2017ला होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची चिन्हे आहेत.

BJP's state will come in UP- Survey | उत्तर प्रदेशमध्ये येणार भाजपचं राज्य- सर्व्हे

उत्तर प्रदेशमध्ये येणार भाजपचं राज्य- सर्व्हे

Next

ऑनलाइन लोकमत

नवी दिल्ली, दि. 12 - उत्तर प्रदेशमध्ये 2017ला होणा-या विधानसभा निवडणुकीत भाजप हा सर्वात मोठा पक्ष म्हणून समोर येण्याची चिन्हे आहेत. यूपीत भाजपा बहुमत सिद्ध करून सरकार स्थापण्याच्या स्थितीत येऊ शकते, तर मायावतींची बहुजन समाज पार्टी दुस-या स्थानावर झेप घेण्याची शक्यता आहे, असा अंदाज इंडिया टुडे आणि एक्सिस माय इंडियाच्या ओपिनियन पोलमध्ये व्यक्त करण्यात आला आहे. उत्तर प्रदेशमध्ये खरी लढत भाजप आणि बहुजन समाज पार्टी यांच्यात रंगणार आहे. समाजवादी पार्टी तिस-या स्थानावर फेकली जाणार असून, काँग्रेसच्या कामगिरीत काहीच सुधारणा नाही, असं या सर्व्हेतून समोर आलं आहे.

इंडिया टुडे आणि एक्सिसच्या ओपिनियन पोलमध्ये भाजपाला 31 टक्के मतांसह 170 ते 183 जागा मिळण्याचा अंदाज व्यक्त करण्यात आला आहे. तर बहुजन समाज पार्टीला 28 टक्के मतांसह 94-103 जागा मिळण्याची शक्यता आहे. सत्ताधारी समाजवादी पार्टी या पोलमध्ये तिस-या स्थानी फेकली जाणार असल्याचं दाखवण्यात आलं असून, सपाला 25 टक्के मतं मिळण्याची शक्यता आहे. सर्व्हेत काँग्रेस 6 टक्के मतांसह 8-12 जागा जिंकू शकेल, तर इतर पक्ष 10 टक्के मतांसह 2 ते 6 जागा मिळवतील, असा अंदाज आहे.

मात्र या सर्व्हेत मुख्यमंत्रिपदासाठी बहुजन समाज पार्टीच्या मायावतींना सर्वाधिक पसंती मिळाली आहे. 31 टक्के लोकांनी मायावतींना पुन्हा मुख्यमंत्रिपदी विराजमान होण्यासाठी पसंती दर्शवली आहे. तर अखिलेश यांना 27 टक्के लोकांनी मुख्यमंत्रिपदासाठी पसंती दिली. मुलायम सिंह यांना 1 टक्के, राजनाथ सिंह यांना 18 टक्के, तर योगी आदित्यनाथ यांना 14 टक्के लोकांनी पसंती दिली. प्रियंका गांधींना 2 टक्के, काँग्रेसच्या शीला दीक्षित यांना फक्त 1 टक्के लोकांची सहमती मिळाली आहे. या ओपिनियन पोलमुळे भाजपाला आनंदाचं भरतं आलं आहे. मात्र प्रशांत किशोर यांच्या अनेक प्रयत्नांतूनही उत्तर प्रदेशमध्ये काँग्रेसची स्थिती सुधारण्याची काहीच चिन्हे नाहीत, असं सर्व्हेतून समोर आलं आहे. बहुजन समाज पार्टी आणि समाजवादी पार्टीसाठी हा ओपिनियन पोल म्हणजे आत्मपरीक्षण करण्याचा इशारा असल्याचं जाणकारांचं मत आहे.

Web Title: BJP's state will come in UP- Survey

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.