Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात भाजपचे तालिबानी राज; नाना पटोले यांचा आरोप
By ऑनलाइन लोकमत | Updated: October 4, 2021 14:15 IST2021-10-04T14:15:14+5:302021-10-04T14:15:45+5:30
प्रियंका गांधी यांच्या अटकेचा तीव्र निषेध; योगी सरकार प्रियंका गांधींना घाबरले, पटोले यांचं वक्तव्य

Uttar Pradesh : उत्तर प्रदेशात भाजपचे तालिबानी राज; नाना पटोले यांचा आरोप
अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या सरचिटणीस व उत्तर प्रदेशच्या प्रभारी प्रियंका गांधी या पीडित शेतकरी कुटुंबीयांना भेटण्यास जाताना उत्तर प्रदेश पोलिसांनी त्यांना केलेल्या अटकेचा महाराष्ट्र प्रदेश काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष नाना पटोले यांनी तीव्र निषेध केला आहे. उत्तर प्रदेशात कायद्याचे राज्य नसून अजयसिंह बिष्ट यांच्या नेतृत्वाखालील तालिबानी राज असल्याचा घणाघाती आरोप नाना पटोले यांनी केला आहे.
"मोदी सरकारमधील गृहराज्यमंत्री अजय मिश्रा यांच्या मुलाच्या कारने शेतकऱ्यांना चिरडले. मंत्र्यांच्या मुलावर कारवाई करण्याऐवजी त्याला वाचवण्यासाठी अजयसिंह बिष्ट यांचे सरकार आटापिटा करत आहे. तर पीडित शेतकरी कुटुंबीयांना भेटून त्यांचे अश्रू पुसण्यासाठी जात असताना काँग्रेस नेत्या प्रियंका गांधी, खासदार दिपेंदर हुड्डा व काँग्रेस कार्यकर्ते यांच्याशी पोलीसांनी गैरवर्तन केले. तसेच त्यांना बेकायदेशीर अटक केली. उत्तर प्रदेशात लोकशाहीचा गळा घोटला जात असून शेतकरी, दलित, वंचित, अल्पसंख्यांक समाजावर अन्याय व अत्याचार केले जात आहेत, पिडीत कुटुंबीयांना भेटू दिले जात नाही," असे पटोले म्हणाले.
अनेक ठिकाणी अडवले
प्रियंका गांधी यांना लखीमपूर खेरीला जात असताना रस्त्यावर अनेक ठिकाणी अडवण्यात आले. प्रियंका गांधी यांना भारतीय जनता पक्ष व उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री का घाबरतात? पीडित कुटुंबीयांना भेटणे भाजपाच्या राज्यात गुन्हा आहे का? उत्तर प्रदेशातील भाजपाच्या अत्याचारी राजवटीला तेथील जनता कंटाळली आहे. या अत्याचारी सरकारला जनता धडा शिकवेल. काँग्रेस पक्ष जनतेच्या पाठीशी खंबीरपणे उभा असून प्रियंकाजी गांधी यांना पीडित कुटुंबीयांना भेटण्यापासून कोणीही रोखू शकणार नसल्याचंही त्यांनी सांगितलं.