पुढील लोकसभेसाठी भाजपचे ३५० जागांचे लक्ष्य
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 18, 2017 04:42 AM2017-08-18T04:42:19+5:302017-08-18T04:42:25+5:30
लोकसभा निवडणूक दोन वर्षांनंतर होणार असली तरी त्यासाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे.
नितीन अग्रवाल ।
नवी दिल्ली : लोकसभा निवडणूक दोन वर्षांनंतर होणार असली तरी त्यासाठीची तयारी भारतीय जनता पक्षाने आतापासूनच सुरू केली आहे. पक्षाचे अध्यक्ष अमित शहा यांनी वरिष्ठ मंत्र्यांना ३५० जागा जिंकण्याचे लक्ष्य साध्य करण्यासाठी जोरदार प्रयत्न करण्याचे आदेश दिले आहेत.
गुरुवारी शहा यांनी वरिष्ठ नेते व केंद्रीय मंत्र्यांचा भाजपच्या येथील मुख्यालयात वर्गच घेतला. कमकुवत जनाधार असलेल्या मतदार संघांवर खास लक्ष देण्यास शहा यांनी मंत्र्यांना सांगितले. ते म्हणाले, ‘‘लोकसभेच्या १५० जागांवर पक्षाचा पराभव झाला होता त्या जिंकण्यासाठी कठोर परिश्रम करा. आतापासूनच तयारीला लागा.’’
सार्वत्रिक निवडणुकीसाठी साधारण दोन वर्षांचा कालावधी आहे त्यामुळे मंत्र्यांनी आपापल्या जागा निवडून त्यासाठी कष्ट करायला सुरवात करावी, असे त्यांनी सांगितले.
३० पेक्षा जास्त नेते बैठकीस उपस्थित होते. त्यात मनुष्यबळ विकास मंत्री प्रकाश जावडेकर, उर्जा मंत्री पियुष गोयल, पेट्रोलियम मंत्री धर्मेंद्र प्रधान, अनंत कुमार, रविशंकर प्रसाद, नरेंद्र सिंह तोमर, जे. पी. नद्दा, निर्मला सीतारामन, मनोज सिन्हा, अर्जुन मेघवाल आदींचा समावेश होता. शहा यांनी मंत्र्यांकडून त्यांच्या मंत्रालयांच्या वतीने चालवल्या जात असलेल्या योजना व प्रत्यक्षातील परिस्थिती यांची माहिती घेतली.
२०१४ च्या लोकसभा निवडणुकीत भाजपला दुसरे आणि तिसरे स्थान मिळाले अशा जागांवर शहा यांचा भर होता. या बैठकीत अशा जागांचे सादरीकरणही केले गेले. २०१४ च्या निवडणुकीत २७२ जागांचे लक्ष्य ठरवले गेले होते आता शहा यांनी ते ३५० जागांचे केले आहे.
>अनेक योजनांचा घेतला आढावा
मंत्रालयांकडून चालवल्या जात असलेल्या योजनांची प्रत्यक्ष स्थिती काय आहे याची माहिती शहा यांनी घेतलीच त्यासोबत पक्षाकडून मंत्र्यांकडे सोपवण्यात आलेल्या कार्यक्रमाबद्दलही प्रश्न विचारले. त्यात मोदी सरकारच्या योजनांचा प्रचार आणि सरकारी योजनांचा लाभ जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहोचणे व प्रभावशाली लोकांशी संपर्क व संवाद साधण्याच्या कार्यक्रमाबद्दलही माहिती घेतली