भाजपाचे मुख्यमंत्रिपदाचे तीन उमेदवार आमच्या संपर्कात, आपचा दावा
By ऑनलाइन लोकमत | Published: August 28, 2019 04:10 PM2019-08-28T16:10:46+5:302019-08-28T16:18:45+5:30
दिल्लीतील विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने येथील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या आप आणि भाजपामध्ये शह-काटशहाचा खेळ रंगू लागला आहे.
नवी दिल्ली - दिल्लीतील विधानसभेची निवडणूक आता काही महिन्यांवर येऊन ठेपल्याने येथील एकमेकांचे कट्टर प्रतिस्पर्धी असलेल्या आप आणि भाजपामध्ये शह-काटशहाचा खेळ रंगू लागला आहे. दरम्यान, आपचे ज्येष्ठ नेते संजय सिंह यांनी भाजपाच्या मुख्यमंत्रिपदाच्या उमेदवारांबाबत मोठा दावा केला आहे.
''भाजपामध्ये मुख्यमंत्रिपदाचे तीन उमेदवार आमच्या संपर्कात आहेत. विशेष म्हणजे हे तिघेही आमच्या संपर्कात आहेत. यापैकी एकाला जरी भाजपाने मुख्यमंत्रिपदाचा उमेदवार घोषित केले तर उर्वरित दोघेजण आम्हाला मदत करतील. त्यामुळे विजेंद्र गुप्ता, विजय गोयल आणि मनीष तिवारी यांच्यापैकी मुख्यमंत्री बनण्याची कुणाची इच्छा आहे हे भाजपाने आधीच ठरवून घ्यावे,'' असा टोला संजय सिंह यांनी लगावला आहे.
भाजपा के तीन CM उम्मीदवार हैं तीनों हमारे सम्पर्क में हैं जिसको घोषित किया बाक़ी दो हमारी मदद करेंगे।
— Sanjay Singh AAP (@SanjayAzadSln) August 28, 2019
यावेळी भाजपाच्या आर्थिक धोरणांवरही संजय सिंह यांनी टीका केली. ते म्हणाले, ''भाजपा खोट्या अजेंड्यावर काम करते. आर्थिक मंदीसारख्या विषयावर चर्चा होऊ नये यासाठी नामांतरासारखे खोटे मुद्दे पुढे केले जातात. भाजपाने सध्या कामाची पद्धत बदलण्याची गरज आहे. नाव बदलून काही होणार नाही.''