Chakka Jam Updates : चक्का जाम आंदोलन शांततेत, नव्या युगाचा जन्म होईल; राकेश टिकैत यांना विश्वास
By देवेश फडके | Published: February 6, 2021 02:51 PM2021-02-06T14:51:18+5:302021-02-06T14:58:42+5:30
दुपारी १२ वाजता चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली असून, ०३ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे.
नवी दिल्ली : केंद्रीय कृषी कायद्याविरोधात शेतकऱ्यांचे आंदोलन सुरूच आहे. त्याचाच एक भाग म्हणून शेतकऱ्यांनी संपूर्ण देशभरात चक्का जाम करण्याचे आवाहन केले. दुपारी १२ वाजता चक्का जाम आंदोलनाला सुरुवात झाली असून, ०३ वाजेपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे. भारतीय किसान युनियनचे नेते राकेश टिकैत यांनी यावर आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. (chakka jam delhi farmers protest)
शेतकऱ्यांचे चक्का जाम आंदोलन शांततापूर्ण पद्धतीने सुरू आहे. देशाच्या मातीशी शेतकऱ्यांना जोडले जाणार आहे. यामुळे नव्या युगाचा जन्म होईल, असा विश्वास राकेश टिकैत यांनी व्यक्त केला आहे.
'जय श्रीराम'च्या घोषणेने ममता दीदी नाराज का होतात; जेपी नड्डा यांचा थेट सवाल
रोटी, तिजोरी बंद न होण्यासाठी आंदोलन
शेतकरी आंदोलनात राजकारण केले जात असल्याच्या आरोपावर उत्तर देताना राकेश टिकैत म्हणाले की, या आंदोलनात राजकारण करणारी कोणीही व्यक्ती सहभागी झालेली नाही. रोटी, तिजोरी बंद होऊ नये, यासाठी हे आंदोलन केले जात आहे. शेतकरी कुठेही जाणार नाहीत. ०२ ऑक्टोबरपर्यंत हे आंदोलन सुरू राहणार आहे.
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात आंदोलन का नाही?
उत्तर प्रदेश आणि उत्तराखंडात आंदोलन का केले जात नाही, असा प्रश्न राकेश टिकैत यांना विचारण्यात आला. यावर, उत्तर प्रदेश आणि उत्तराखंड येथे काही गडबड होऊ शकते, अशी माहिती आम्हाला मिळाली होती. त्यामुळे या दोन्ही राज्यातील चक्का जाम आंदोलन मागे घेण्यात आले, असे राकेश टिकैत यांनी सांगितले.
दुपारी १२ ते ०३ या कालावधीत चक्का जाम
दुपारी १२ ते ३ या वेळेत चक्का जाम आंदोलन केले जाणार आहे. उत्तर प्रदेश, दिल्ली-एनसीआर, उत्तराखंडमध्ये या भागांमध्ये चक्का जाम आंदोलन केले जाणार नाही. मात्र, उर्वरित देशभरात आंदोलन सुरू झाले आहे. 'चक्का जाम'च्या कालावधीत अत्यावश्यक सेवेतील वाहने, शाळेच्या बस व रुग्णवाहिकांची वाट मोकळी केली जाणार आहे.
Punjab: Protesters block roads as part of 'Chakka Jaam' call given by farmers from 12 pm to 3 pm today; visuals from Golden Gate on Delhi-Amritsar National Highway in Amritsar #FarmLawspic.twitter.com/X4pEN56Kct
— ANI (@ANI) February 6, 2021
देशभरात चक्का जाम आंदोलनाला पाठिंबा
चक्का जाम आंदोलन सुरू झाल्यानंतर काही आंदोलकांनी बंगळुरूमधील येलहांका पोलीस ठाण्यासमोर येऊन धरणे देण्यास सुरुवात केली. या आंदोलकांना पोलिसांनी ताब्यात घेतले. तर, चक्का जाम आंदोलनाला पंजाबमध्ये चांगला प्रतिसाद मिळताना दिसत आहे. संगरूर जिल्ह्यातील मूनाक-तोहना महामार्गावर महिलांनी ठिय्या देत वाहतूक रोखली. शेतकऱ्यांच्या चक्का जामला जम्मूमध्येही प्रतिसाद मिळला. आंदोलकांनी रस्त्यावर येत जम्मू-पठाणकोट महामार्ग रोखला.