Farmers Protest: “अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा अधिक फैलाव”: राकेश टिकैत
By ऑनलाइन लोकमत | Published: June 9, 2021 06:47 PM2021-06-09T18:47:09+5:302021-06-09T18:47:31+5:30
Farmers Protest: राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली.
कोलकाता: केंद्राच्या वादग्रस्त कृषी कायद्याच्या विरोधात गेल्या सहा महिन्यांपासून शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू आहे. भारतीय किसान युनियनचे नेते आणि प्रवक्ते राकेश टिकैत या आंदोलनाचे नेतृत्व करत आहेत. कोरोनाच्या संकटामुळे शेतकरी आंदोलन प्रभावित झाले होते. मात्र, कोरोनाची दुसरी लाट ओसरताना दिसत असून, आता पुन्हा एकदा शेतकरी आंदोलन तीव्र करण्यासाठी राकेश टिकैत यांनी कंबर कसल्याचे पाहायला मिळत आहे. या पार्श्वभूमीवर राकेश टिकैत पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. यावेळी अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोनाचा अधिक प्रमाणात पसरत असल्याचा आरोप राकेश टिकैत यांनी केला आहे. (bku rakesh tikait criticised amit shah over corona situation in country)
शेतकरी नेते राकेश टिकैत सध्या पश्चिम बंगालमध्ये असून त्यांनी मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांची भेट घेतली. या भेटीदरम्यान शेतकरी आंदोलनाचं स्वरुप, बंगालमधल्या शेतकऱ्यांच्या समस्या आणि त्यांच्या विषयांवर चर्चा झाल्याची माहिती मिळाली आहे. यानंतर पत्रकारांशी राकेश टिकैत यांनी संवाद साधला. यावेळी त्यांनी केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यावर जोरदार टीका केली.
अमित शहांसारख्या नेत्यांमुळेच कोरोना पसरतोय
शेतकरी आंदोलनामुळे कोरोनाचा फैलाव वाढतोय असं वाटत नाही का, असा प्रश्न टिकैत यांना विचारण्यात आला. तेव्हा आम्ही मोठी मिटींग घेतली नाही. त्यामुळे कोरोनाचा फैलाव होण्याचा प्रश्नच नाही. आम्ही सगळेजण करोना नियमांचं पालन करुन आंदोलन करत आहोत. पश्चिम बंगाल निवडणुकांच्या कालावधीत कोरोनाचा भरपूर फैलाव झाला. तसेच पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि आणि अमित शाह यांच्या रॅली, बैठका झाल्या आणि त्यामुळे कोरोनाच आणखीनच पसरला, असा आरोप करत ममता बॅनर्जी नंदीग्राममधून निवडणूक लढवणार आहेत, याची मला कल्पना नव्हती, असा दावाही टिकैत यांनी केला आहे.
केंद्र सरकारवर शेतकरी कायद्यासंदर्भात दबाव टाकावा
तुम्हीही ममता यांच्या प्रचारात सहभागी होता, असे विचारल्यावर टिकैत म्हणाले की, आम्ही प्रचार केला म्हणूनच आम्ही त्यांच्यासमोर आमच्या मागण्या मांडत आहोत. आम्हाला असे वाटत आहे की, विरोधी पक्षांनी आमच्या सोबत यावे आणि केंद्र सरकारवर शेतकरी कायद्यासंदर्भात दबाव टाकावा, अशी अपेक्षा टिकैत यांनी व्यक्त केली.
ममता बॅनर्जी यांची केंद्रावर जोरदार टीका
यावेळी बोलताना ममता बॅनर्जी यांनी केंद्रातील मोदी सरकारवर जोरदार टीकास्त्र सोडले. पश्चिम बंगालमध्ये आम्ही ठराव मंजूर करून केंद्राचे कृषी कायदे रद्द केले. शेतकऱ्यांसाठी उपोषण केले, आंदोलनात सहभागी झाले. जोपर्यंत शेतकऱ्यांचे आंदोलन सुरू राहील, तोपर्यंत माझा याला पाठिंबा राहील, असे आश्वासन ममता बॅनर्जी यांनी दिले. कोरोनाची लाट ओसरल्यानंतर अन्य राज्यातील मुख्यमंत्र्यांशी चर्चा केली जाईल. केंद्र सरकार शेतकऱ्यांशी पुन्हा चर्चा का करत नाही, अशी विचारणा करत वादग्रस्त कृषी कायदे मागे घ्यावेत, अशी मागणीही ममता बॅनर्जी यांनी केली.