आता विमानाप्रमाणेच रेल्वेतही ब्लॅक बॉक्स; दुर्घटना रोखण्यात मदत होणार
By ऑनलाइन लोकमत | Published: May 12, 2018 12:38 PM2018-05-12T12:38:05+5:302018-05-12T12:38:05+5:30
रेल्वे गाड्यांमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
लखनऊ: रेल्वेनं प्रवाशांच्या सुरक्षेसाठी महत्त्वपूर्ण पाऊल उचललं आहे. यापुढे रेल्वे गाड्यांमध्ये विमानांप्रमाणेच ब्लॅक बॉक्स असणार आहे. ब्लॅक बॉक्स असलेल्या रेल्वेच्या डब्ब्यांचं अनावरण रायबरेलीतील रेल कोच फॅक्टरीमध्ये करण्यात आलं. रेल्वे गाड्यांमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखण्यात महत्त्वाची भूमिका बजावणार आहेत.
'ब्लॅक बॉक्स असलेले स्मार्ट कोचेस रेल्वे वाहतूक क्षेत्रात मैलाचा दगड ठरतील. यामुळे रेल्वे प्रवास आणखी सुरक्षित आणि सुखकर होईल,' असं रायबरेली कोच फॅक्टरीचे व्यवस्थापक राजेश अगरवाल यांनी सांगितलं. राष्ट्रीय तंत्रज्ञान दिनानिमित्त ब्लॅक बॉक्स असलेल्या स्मार्ट कोचेसचं अनावरण करण्यात आलं. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून अंतर्गत वायर्सचं तापमान मोजलं जाईल. याशिवाय केबलची स्थितीदेखील तपासली जाईल. त्यामुळे शॉर्ट सर्किट आणि त्यामुळे होणारं नुकसान टाळता येऊ शकेल. ब्लॅक बॉक्समुळे प्रवाशांचा प्रवास सुरक्षित होईल. याशिवाय त्यांना मिळणाऱ्या सुविधांमध्येही वाढ होईल.
रेल्वेतील ब्लॅक बॉक्स विमानातील ब्लॅक बॉक्सच्या तुलनेत अधिक कार्यक्षम आणि अत्याधुनिक असतील, असं मुख्य अभिनेते इंद्रजित सिंग यांनी सांगितलं. 'विमानातील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकत नाहीत. मात्र स्मार्ट कोचेसमधील ब्लॅक बॉक्स अपघात रोखू शकतात. अनेकदा एक्स्प्रेस गाड्या रुळांवरुन घसरतात. असे अपघात रोखण्यात ब्लॅक बॉक्स महत्त्वाची भूमिका बजावेल. ब्लॅक बॉक्सच्या माध्यमातून विविध निकष लक्षात घेऊन सुरक्षेचं मूल्यमापन केलं जाईल. यावेळी काही दोष आढळल्यास त्याची माहिती आपोआप देखरेख करणाऱ्या यंत्रणेला देण्यात येईल. त्यानंतर आवश्यक ती दुरुस्ती केली जाईल,' अशी माहिती सिंग यांनी दिली.