ओळखीसाठी ‘ब्लॅक कॉर्नर’ नोटीस

By admin | Published: January 12, 2016 04:30 AM2016-01-12T04:30:47+5:302016-01-12T04:30:47+5:30

पाकिस्तानवर दबाव वाढविण्याच्या रणनीतीनुसार पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची ओळख पटविण्यासाठी इंटरपोलच्या माध्यमातून ‘ब्लॅक कॉर्नर’

'Black Corner' Notice for Identity | ओळखीसाठी ‘ब्लॅक कॉर्नर’ नोटीस

ओळखीसाठी ‘ब्लॅक कॉर्नर’ नोटीस

Next

नवी दिल्ली : पाकिस्तानवर दबाव वाढविण्याच्या रणनीतीनुसार पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यात मारल्या गेलेल्या अतिरेक्यांची ओळख पटविण्यासाठी इंटरपोलच्या माध्यमातून ‘ब्लॅक कॉर्नर’ नोटीस जारी केली जाणार असताना हल्ल्याच्या स्थळी आणखी एक मोबाईल सापडल्यामुळे हल्ल्याचे पाकिस्तानशी असलेले धागेदोरे जुळविण्याच्या कामाला गती मिळाली आहे.
शोधमोहिमेदरम्यान तपास चमूला मोबाईल फोनसह एके-४७ रायफल आणि एक दुर्बीण आढळून आली. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पंजाबमधील साक्षीदारांची चौकशी सुरू केली असल्याचे गृह मंत्रालयाच्या सूत्रांनी सांगितले. हल्ल्याचा सीमापार संबंध पाहता भारताने २ जानेवारी रोजी पाकिस्तानला अतिरेक्यांच्या सहभागासंबंधी काही दस्तऐवज आणि पुरावे सादर केले आहेत. याच मालिकेत इंटरपोलने नोटीस जारी करावी यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
भारताने पाकिस्तानला पुरावे देतानाच कठोर कारवाईची मागणी केल्यामुळे दोन देशांदरम्यान १५ जानेवारी रोजी होणारी सचिव स्तरावरील चर्चा अनिश्चिततेच्या गर्तेत सापडली आहे. एनआयएने गुरुदासपूरचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांची सोमवारी सुरू केलेली चौकशी मंगळवारीही कायम राहणार आहे. त्यांचे मित्र राजेश वर्मा, खानसाम्यालाही दिल्लीत पाचारण केले जाणार असल्याचे सूत्रांनी सांगितले. (लोकमत न्यूज नेटवर्क)

पाक सीमेलगत हाय अलर्ट
पाकिस्तानी अतिरेकी संघटनांकडून हल्ल्यांचा धोका लक्षात घेता भारत-पाकिस्तान सीमेलगतच्या सर्व संरक्षण संस्थांना अतिसतर्कतेचा इशारा देण्यात आला आहे.
केंद्रीय गृहमंत्री राजनाथसिंग यांनी सोमवारी एका उच्चस्तरीय बैठकीत देशातील सुरक्षा स्थितीचा आढावा घेतला. संरक्षण संस्थांची सुरक्षा वाढविण्यावर भर दिला जात आहे.

एनआयएकडे ३ प्रकरणे
एनआयएने तीन प्रकरणांचा तपास हाती घेतला आहे. पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांचे अपहरण आणि टॅक्सीचालकाच्या हत्येसंबंधी दोन प्रकरणांचा त्यात समावेश आहे.
तिसरे प्रकरण पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्यासंबंधी म्हणजे मुख्य गुन्ह्णांसबंधी असून पठाणकोट पोलीसठाणे विभाग दोन मध्ये नोंदण्यात आले आहे.

सलविंदरसिंग एनआयएसमोर हजर
पंजाबचे पोलीस अधीक्षक सलविंदरसिंग यांनी सोमवारी पठाणकोट हल्ल्याबाबत तपास करणाऱ्या राष्ट्रीय तपास संस्थेसमोर(एनआयए) हजेरी लावली. ते पंजाब सशस्त्र पोलीस दलाच्या ७५ व्या बटालियनचे सहायक कमांडंट आहेत.
सलविंदरसिंग यांनी एनआयए आणि पंजाब पोलिसांना दिलेल्या निवेदनात विसंगती आढळल्यामुळे त्यांच्यावर सखोल चौकशीला सामोरे जाण्याची पाळी आली आहे. त्यांची सत्यमापन चाचणी (लायडिटेक्टर टेस्ट) होण्याची शक्यताही नाकारण्यात आलेली नाही.
अलीकडेच शिस्तभंगाच्या कारवाईमुळे सलविंदरसिंग यांना गुरुदासपूरच्या मुख्यालयातून हटविण्यात आले होते. पठाणकोट हवाई तळावरील हल्ल्याबाबत एनआयएने तीन गुन्हे दाखल केले आहेत.

Web Title: 'Black Corner' Notice for Identity

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.