बेळगावमध्ये काळा दिन! मराठी अस्मिता एकवटली; प्रश्न तडीस गेल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही
By ऑनलाइन लोकमत | Published: November 2, 2019 02:59 AM2019-11-02T02:59:11+5:302019-11-02T02:59:20+5:30
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगावमध्ये शुक्रवारी काळा दिन पाळण्यात आला
बेळगाव : बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे, रहेंगे तो महाराष्ट्रमे नही तो जेलमे, अशा घोषणा देत शुक्रवारी बेळगावात काळा दिन पाळण्यात आला. दंडाला काळ्या फिती, हातात भगवे ध्वज, डोक्यावर भगवा फेटा बांधून अनेकजण सायकल फेरीत सहभागी झाले होते.
अत्याचाराला दाद न देता आपण लढा चालू ठेवला हे कौतुकास्पद आहे. हा प्रश्न तडीला लावल्या शिवाय आम्ही स्वस्थ बसणार नाही. सीमावासियांचे प्रश्न, समस्या विधानसभेत नक्की मांडेन असे, उद्गार आमदार राजेश पाटील यांनी काढले. मराठा मंदिर येथे महाराष्ट्र एकीकरण समितीच्या काळ्या दिनाच्या सभेत ते बोलत होते. व्यासपीठावर समितीचे अध्यक्ष दीपक दळवी, माजी आमदार मनोहर किणेकर, प्रकाश मरगाळे, मालोजीराव अष्टेकर आदी उपस्थित होते. जर सीमा भागातील कोणत्याही मराठी भाषिक नागरिकला त्रास द्याल तर बेळगावात संपूर्ण चंदगड घेऊन घूसू, असा इशारा देण्यात आला.
बेळगाव, कारवार, निपाणी, बिदर, भालकीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे अशा घोषणा देत बेळगावमध्ये शुक्रवारी काळा दिन पाळण्यात आला. सीमा भागातील मराठी भाषिक लोकांना न्याय मिळावा म्हणून चंदगड तालुक्यातील सर्व पक्षीय तरुण काळ्या फिती बांधून रस्त्यावर उतरले होते.
‘शिवसेना सीमा बांधवांच्या पाठीशी ठाम’
सीमा भागासाठी ६९ शिवसैनिकांनी बलिदान दिले. बेळगाव, कारवार, निपाणीसह संयुक्त महाराष्ट्र झालाच पाहिजे या मागणीवर शिवसेना आजही ठाम आहे, असे आश्वासन शिवसेनेचे विधी मंडळ गट नेते एकनाथ शिंदे यांनी दिले आहे.