सूर्यावर दिसणार बुधाचा काळा ठिबका
By admin | Published: May 5, 2016 03:48 AM2016-05-05T03:48:27+5:302016-05-05T03:48:27+5:30
बुधाचे सूर्यावर होणारे संक्रमण येत्या ९ मे रोजी दिसणार असून, जवळजवळ १० वर्षांनंतरच्या कालखंडानंतर ही प्रक्रिया भारतीय खगोलप्रेमींना बघायला मिळण्याचा दुर्मीळ योग जुळून आलेला
कोलकाता : बुधाचे सूर्यावर होणारे संक्रमण येत्या ९ मे रोजी दिसणार असून, जवळजवळ १० वर्षांनंतरच्या कालखंडानंतर ही प्रक्रिया भारतीय खगोलप्रेमींना बघायला मिळण्याचा दुर्मीळ योग जुळून आलेला असेल. सूर्याच्या तबकडीवर एका टोकाहून दुसऱ्या टोकाला सरकणारा काळ्या रंगाचा ठिबका म्हणजे बुध असेल, असे कोलकात्याच्या पोझिशनल अॅस्ट्रॉनॉमी सेंटरचे संचालक संजीव सेन यांनी सांगितले.
सूर्य, बुध आणि पृथ्वी एकाच रेषेत येतात तेव्हाच बुधाचा हा प्रवास बघता येऊ शकतो. पृथ्वीवरून दिसणाऱ्या सूर्याच्या तुलनेत बुधाच्या कोनाचा आकार अतिशय छोटा असल्यामुळे तो ठिबक्यासारखा दिसेल. आशियाच्या बहुतांश भागात बुधाचा सूर्यावरील ठिबका दिसू शकेल. (आग्नेय आशिया आणि जपान वगळता) युरोप, आफ्रिका, ग्रीनलँड, दक्षिण अमेरिका, उत्तर अमेरिका, आर्टिक, उत्तर अटलांटिक तसेच पॅसिफिकच्या बहुतांश भागातही तो दिसणार आहे. (वृत्तसंस्था)
२०३२ मध्ये पुन्हा योग...
यानंतर भारतात बुधाचे संक्रमण १६ वर्षांच्या कालखंडानंतर म्हणजे २०३२ साली दिसू शकेल. बुधाच्या संक्रमणाची ही प्रक्रिया अतिशय दुर्मीळ असून, बहुतांश वेळा मे आणि नोव्हेंबर महिन्यात शतकातून केवळ १३ ते १४ वेळा हा योग जुळून येतो. नोव्हेंबरमध्ये बुधाचे संक्रमण जुळून आल्यास त्यानंतर ७, १३ किंवा ३३ वर्षांनी त्याच महिन्यात ही प्रक्रिया दिसून येते. मे ते मे महिन्यातील संक्रमणाचा काळ १३ किंवा ३३ वर्षांनी येतो.