काळ्या बुरशीचं भयानक रुप! २३ वर्षीय तरुणाचा कोणतंही लक्षण नसताना मृत्यू; भीतीचं वातावरण
By ऑनलाइन लोकमत | Published: May 22, 2021 08:19 PM2021-05-22T20:19:49+5:302021-05-22T20:20:20+5:30
कोरोनानंतर आता गुजरातमध्ये म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना म्यूकरमायकोसिस होत असल्याचं दिसून येत आहे.
कोरोनानंतर आता गुजरातमध्ये म्यूकरमायकोसिसचा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे. कोरोनामुक्त झालेल्या नागरिकांना म्यूकरमायकोसिस होत असल्याचं दिसून येत आहे. यातच गुजरातच्यासूरत येथे एक भयानक प्रकार समोर आला आहे. ज्यानं डॉक्टर देखील चक्रावले आहेत. एका २३ वर्षीय तरुणाला कोणतेही लक्षण नसूनही त्याच्या डोक्यात काळ्या बुरशीची लागण झाल्याचं दिसून आलं. धक्कादायक बाब अशी की सुरुवातीला मेंदूत एक सामान्य गाठ आल्यानं सूज आल्याचं दिसून आलं होतं. पण काही कालावधीनंतर ती गाठ नसून म्यूकरमायकोसिस म्हणजेच काळी बुरशीची लागण झाल्याचं निष्पन्न झालं.
सूरत येथील कोसम्बा परिसरात राहणाऱ्या या २३ वर्षीय तरुणाला २८ एप्रिल रोजी कोरोनाची लागण झाली होती. त्यानंतर त्याला रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. ४ मे रोजी कोरोनावर मात करुन तो घरी परतला होता. पण ८ मे रोजी त्याला बेशुद्ध अवस्थेत पुन्हा रुग्णालयात दाखल करण्यात आलं. यावेळी सूरत येथील सिम्स रुग्णालयात त्याच्यावर उपचार सुरू होते. प्राथमिक चाचण्यानंतर त्याच्या डोक्यात सामान्य स्वरुपाची गाठ असल्यानं सूज आल्याचं दिसून आलं होतं. डॉक्टरांच्या म्हणण्यानुसार, त्याच्यात म्यूकरमायकोसिसची कोणतीही लक्षण दिसून आली नव्हती.
शस्त्रक्रिया करण्यात आल्यानंतर दोन दिवस त्याची प्रकृती स्थित होती. पण त्यानंतर अचानक त्याची तब्येत बिघडली आणि हृदयविकाराच्या झटक्यानं त्याचं निधन झालं. डॉक्टरांनी त्याच्या बायोस्पी चाचणीसाठी काही नमुने पाठवले होते. त्याचे रिपोर्ट पाहून डॉक्टर देखील हैराण झाले. या रिपोर्टमध्ये तरुणाला म्यूकरमायकोसिसची लागण झाल्याचं समोर आलं होतं. महत्वाची बाब अशी म्यूकरमायकोसिस तिसऱ्या स्टेजमध्ये मस्तकापर्यंत पोहोचतो. त्यामुळे कोणतंही लक्षण नसतानाही रुग्ण म्यूकरमायकोसिसच्या तिसऱ्या स्टेजपर्यंत पोहोचल्यानं आश्चर्य व्यक्त केलं जात आहे.
काळ्या बुरशीचा आजार दिवसेंदिवस वाढत असल्यानं अनेक राज्यांनी या रोगाला महामारी म्हणून घोषीत केलं आहे. त्यासाठी सरकार मोठ्या प्रमाणात तयारी देखील करत आहे. पण सूरतमधील या प्रकरणानं सर्वांच्या चिंतेत भर टाकली आहे.