काळा पैसा : ईडीकडून ९००३ कोटींची संपत्ती जप्त, १७३ आरोपपत्र दाखल
By admin | Published: April 29, 2015 11:28 PM2015-04-29T23:28:00+5:302015-04-29T23:28:00+5:30
सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) काळा पैसा ठेवणारे आणि मनी लाँडरिंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करीत २०१४-१५ या वित्त वर्षात ९००३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली
नवी दिल्ली : सक्त वसुली संचालनालयाने (ईडी) काळा पैसा ठेवणारे आणि मनी लाँडरिंग करणाऱ्यांविरुद्ध कठोर कारवाई करीत २०१४-१५ या वित्त वर्षात ९००३ कोटी रुपयांची संपत्ती जप्त केली आणि १७३ आरोपपत्र दाखल केले.
मनी लाँडरिंग विरोधी कायदा (पीएमएलए) आणि विदेशी चलन व्यवस्थापन कायदा (फेमा) या दोन प्रमुख कायद्यांतर्गत ईडी वित्तीय गुन्ह्यांचा तपास करीत असते. याशिवाय जुन्या विदेशी चलन नियमन कायद्यांतर्गतही (फेरा) काही प्रकरणांचा तपास ईडी करीत आहे. हा कायदा आता रद्द करण्यात आला आहे.
ईडीने यासंदर्भात एक अहवाल तयार केलेला आहे. हा अहवाल काळ्या पैशावरील विशेष तपास पथक (एसआयटी) आणि वित्त मंत्रालयाला सादर करण्यात आला आहे. या अहवालानुसार, ईडीने २०१४-१५ मध्ये पीएमएलए अंतर्गत ९००३.२६ कोटी रुपये किमतीची संपत्ती जप्त केली. १३२६ पीएमएलए एफआयआर दाखल केले, ५२ लोकांना मनी लाँडरिंगच्या आरोपात अटक केली आणि एकूण १७३ आरोपपत्र दाखल केले. या दरम्यान ईडीने ४९२ जप्ती आदेशही जारी केले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
४ईडीने जप्त केलेल्या संपत्तीचे मूल्य मागील वित्त वर्षात ४०७ टक्क्यांनी वाढले. कारण २०१३-१४ मध्ये हे मूल्य १७७३.४१ कोटी रुपये होते. त्यासोबतच अटक करण्यात आलेल्यांची संख्याही ६०० टक्क्यांनी वाढली, तर आरोपपत्र दाखल करण्याचे प्रमाण २१४ टक्क्यांनी वाढले आहे.