काळा पैसा दाखवा; निश्चिंत व्हा!
By admin | Published: June 27, 2016 05:11 AM2016-06-27T05:11:24+5:302016-06-27T05:11:24+5:30
अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी अखेरची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले.
नवी दिल्ली : अघोषित संपत्ती जाहीर करण्यासाठी अखेरची मुदत ३० सप्टेंबरपर्यंत असून या संधीचा लाभ घेण्याचे आवाहन पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रविवारी ‘मन की बात’ या आकाशवाणीवरील कार्यक्रमात केले. स्वेच्छेने संपत्ती किंवा अज्ञात उत्पन्न घोषित केल्यास पैशाच्या स्रोताबाबत कोणताही प्रश्न विचारला जाणार नाही; मात्र संधीची ही खिडकी बंद झाल्यानंतर समस्यांना तोंड देण्याची वेळ येईल, असा इशाराही त्यांनी दिला.
ज्यांच्याकडे अघोषित संपत्ती असेल त्यांना सरकारने एक विशेष संधी दिली आहे. तुम्ही दंड भरून विविध प्रकारच्या बोजातून मुक्त होऊ शकता. अज्ञात उत्पन्नाचे स्रोत काय याबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही असे मी वचन दिले आहे. त्यामुळेच पारदर्शक यंत्रणेचा एक भाग बनण्याची ही एक चांगली संधी आहे. ३० सप्टेंबरपर्यंत असलेली मुदत ही अखेरची संधी असेल, हे मी देशवासीयांना सांगू इच्छितो. कुणाला नियम न पाळल्यामुळे ३० सप्टेंबरनंतर कोणत्याही अडचणींना तोंड देण्याची वेळ आल्यास कोणत्याही प्रकारची मदत करू नका, असे मी भाजपाच्या खासदारांना सांगितले आहे, असेही मोदी म्हणाले. (लोकमत न्यूज नेटवर्क)
>अज्ञात उत्पन्नाचे स्रोत काय याबाबत कोणतीही चौकशी केली जाणार नाही असे मी वचन दिले आहे. त्यामुळेच पारदर्शक यंत्रणेचा एक भाग बनण्याची ही एक चांगली संधी आहे.
- नरेंद्र मोदी, पंतप्रधान
काळ बदलला, पण सवय कायम
एक काळ असा होता की, कर खूप असल्यामुळे कर
भरण्याचे टाळणे किंवा करचोरी करणे हा स्वभाव बनला
होता. त्या काळात विदेशातून वस्तू आणताना अडचणी येत होत्या. त्यामुळे तस्करीही तेवढीच वाढली होती, पण हळूहळू काळ बदलत गेला. आता करदात्यांना सरकारच्या करव्यवस्थेशी जोडणे अधिक अवघड काम राहिलेले नाही, तरीही जुनी सवय गेलेली नाही. नियमांपासून दूर पळत स्वत:ची शांती गमावू नका. कोणतीही छोटी व्यक्ती तुम्हाला अडचणीत आणू शकेल. मग असे का होऊ द्यायचे? आपल्या संपत्ती किंवा उत्पन्नाबाबत सरकारला योग्य माहिती का देऊ नये.
अडचणींपासून मुक्त व्हायचे असेल तर गतकाळात
साठवून ठेवलेल्या बॅगा उघड्या करा, असे आवाहन मी देशवासीयांना करीत आहे, असे मोदींनी स्पष्ट केले.
>आणीबाणीची काळी रात्र
४१ वर्षांपूर्वी लादण्यात आलेल्या आणीबाणीतील काळ्या रात्रीचे स्मरण करवून देताना मोदी म्हणाले की, लोकशाही हीच देशाची खरी ताकद आहे. लोकशाहीची कटिबद्धता पुढे न्यायला हवी. सामान्य नागरिकांच्या लोकशाही अधिकाराचे चमकते उदाहरण आणीबाणीच्या काळात दिसून आले. देशाला त्याचे स्मरण परत परत करवून दिले जावे. २६ जून १९७५ रोजी तत्कालीन पंतप्रधान इंदिरा गांधी यांनी देशात आणीबाणी लागू केली. याच दिवशी लोकांना सशक्त बनणारी लोकशाही तुडवली गेली. जयप्रकाश नारायण यांच्यासह लाखो लोक कारागृहात गेले होते. संपूर्ण देश कारागृह बनला होता. बरेचदा लोक माझ्या ‘मन की बात’ कार्यक्रमाची टर उडवितात. लोकशाहीला कटिबद्ध असल्यानेच हे शक्य झाले, अशी पुस्तीही त्यांनी जोडली.