बड्यांचा काळा पैसा उघड

By admin | Published: April 5, 2016 02:37 AM2016-04-05T02:37:49+5:302016-04-05T03:04:53+5:30

कर चुकविण्यासाठी परदेशात कंपन्या, ट्रस्टस आणि फाउंडेशन्स स्थापन करून आर्थिक व्यवहार केल्याची ११.५ दशलक्ष कागदपत्रे उघड झाली असून, त्यात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन

Black money disclosed | बड्यांचा काळा पैसा उघड

बड्यांचा काळा पैसा उघड

Next

पॅरिस : कर चुकविण्यासाठी परदेशात कंपन्या, ट्रस्टस् आणि फाउंडेशन्स स्थापन करून आर्थिक व्यवहार केल्याची ११.५ दशलक्ष कागदपत्रे उघड झाली असून, त्यात रशियाचे अध्यक्ष ब्लादिमिर पुतीन, पाकिस्तानचे पंतप्रधान नवाझ शरीफ, प्रसिद्ध फुटबॉलपटू लिओनेल मेस्सीसह भारतातील अभिनेते अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय-बच्चन, गरवारे उद्योग समूहाचे अशोक गरवारे, डीएलएफचे के. पी. सिंह व माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे आदींचा समावेश आहे. या कागदपत्रांत ५००हून अधिक भारतीयांची नावे आहेत.
या कागदपत्रांची चौकशी १००पेक्षा जास्त प्रसारमाध्यमांच्या गटांनी केली असून, चौकशांच्या इतिहासातील ही सगळ्यांत मोठी असल्याचे म्हटले आहे. या चौकशीतून सुमारे १४० राजकीय नेत्यांच्या छुप्या संपत्ती व्यवहारांवर प्रकाश पडला आहे. अज्ञात स्रोताकडून ही कागदपत्रे ‘ड्यूश्वे जेईटंग’ या जर्मन दैनिकाने मिळविली व नंतर ती इंटरनॅशनल कॉन्सॉर्टियम आॅफ इनव्हेस्टिगेटिव्ह जर्नालिस्टलाही (आयसीआयजे) दिली. विदेशातील सुमारे २,१४,००० संस्थांशी संबंधित ही कागदपत्रे असून, ४० वर्षांच्या व्यवहारांचा तपशील त्यात आहे. ही कागदपत्रे पनामा येथील कायदा सल्लागार कंपनी मोसॅक फोन्सेकाकडून मिळाली असून, तिची ३५पेक्षा जास्त देशांत कार्यालये आहेत.
ब्लादिमिर पुतीन यांच्या जवळच्या सहकाऱ्याने (त्याचे नाव कागदपत्रांत नाही) दोन अब्ज अमेरिकन डॉलर बँका आणि बनावट कंपन्यांद्वारे गुप्तपणे बाजूला काढून ठेवले, असा या चौकशीचा आरोप आहे. चौकशीमध्ये १२ जणांची नावे आहेत. त्यात काही जण सध्या देशांचे प्रमुख आहेत. पाकिस्तानचे पंतप्रधान व आइसलँडचे पंतप्रधान, युक्रेनचे अध्यक्ष व सौदी अरेबियाचे राजे आणि चित्रपट अभिनेता जॅकी चॅन यांचा समावेश आहे. चीनचे अध्यक्ष शी जिनपिंग यांच्या कुटुंबाचा विदेशातील खात्यांशी संबंध असल्याचा उल्लेख यात आहे. असाच आरोप ब्रिटनचे पंतप्रधान डेव्हिड कॅमेरून यांच्या वडिलांवर असून, आइसलँडच्या पंतप्रधानांनी आर्थिक संकटात लक्षावधी डॉलर्स गुप्तरित्या बँक रोख्यांद्वारे मिळविल्याचाही आरोप आहे.
मोसेक फोन्सेकाच्या संस्थापकांपैकी एक रॅमन फोन्सका यांनी कोणत्याही कायदेशीर चौैकशीला आम्ही जोमदारपणे सहकार्य करू, असे आश्वासन दिले.
आयसीआयजेने आरोप केलेले बहुतेक व्यवहार हे कायदेशीर असल्याचे म्हटले जात आहे. तथापि, ज्यांची नावे या व्यवहारांत समोर आली आहेत त्यांच्या राजकीय कारकिर्दीवर गंभीर स्वरुपाचे परिणाम होणार आहेत. आईसलँडचे पंतप्रधान सिगमुंदूर डेव्हीड गुन्नलाऊगसन यांना या आठवड्यात बहुधा अविश्वास प्रस्तावाला तोंड द्यावे लागेल. यादीमध्ये ज्या ३३ लोकांची व कंपन्यांची नावे आहेत त्यांना अमेरिकन सरकारने काळ््या यादीत टाकले आहे. उघड झालेली कागदपत्रे ही १९७७ पासून ते २०१५ च्या शेवटापर्यंतच्या व्यवहारांची आहेत.
>काळा पैसा बाळगणे महागात पडेल
काळा पैसा नियमित करण्यासाठी सरकारने दिलेली संधी न घेणाऱ्यांना ते धाडस फारच महागात पडेल, असा इशारा अर्थमंत्री अरुण जेटली यांनी सोमवारी
येथे दिला. काही भारतीयांनी कर चुकविण्यासाठी विदेशात बेकायदेशीर मार्गांनी पैसे ठेवल्याच्या वृत्तानंतर अरुण जेटली यांनी वरील इशारा दिला. बेकायदा पैशांच्या संकटाला तोंड देण्यासाठी जागतिक पातळीवर २०१७मध्ये पुढाकार घेतला जाईल व त्यामुळे कोणत्याही व्यक्तीला त्याची संपत्ती लपविणे कमालीचे अवघड जाईल, असे जेटली म्हणाले.
> यांचा आहे समावेश...
अमिताभ बच्चन, ऐश्वर्या राय, डीएलएफचे मालक के.पी. सिंह, इंडिया बुल्सचे समीर गेहलोत, गौतम अदानींचे मोठे बंधू विनोद अदानी, पश्चिम बंगालचे नेते शिशिर बजोरिया, दिल्ली लोकसत्ता पक्षाचे माजी नेते अनुराग केजरीवाल, दिवंगत इक्बाल मिर्ची, गरवारे कुटुंबातील अशोक, आदित्य आणि सुषमा, अपोलो ग्रुपचे ओम्कार कंवर, भारताचे माजी सॉलिसिटर जनरल हरीश साळवे, त्यांची पत्नी मीनाक्षी, साक्षी साळवे, माजी अ‍ॅटर्नी जनरल सोली सोराबजी यांचे चिरंजीव डॉ. जहांगीर एस. सोराबजी. इंडो रामा सिंथेटिक्सचे अध्यक्ष मोहनलाल लोहिया, अब्जाधीश सायरस पुनावालाचे बंधू जावेरे, माजी आमदार अनिल वासुदेव साळगावकर, कॉटेज इंडस्ट्रीज एक्स्पोजिशनचे सीईओ अब्दुल रशीद मीर व त्यांची पत्नी तबस्सूम आणि कर्नाटकचे फलोत्पादन मंत्री शामनूर शिवशंकरअप्पा पाटील यांचे जावई राजेंद्र पाटील आणि अमलगमेशन्स ग्रुपच्या अध्यक्षांची दिवंगत पत्नी इंदिरा सिवासेलम आणि त्यांची कन्या मल्लिका श्रीनिवासन.

Web Title: Black money disclosed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.