‘जनधन’मध्ये काळे धन?
By admin | Published: January 2, 2017 01:19 AM2017-01-02T01:19:53+5:302017-01-02T01:19:53+5:30
चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर, जनधन खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रकमा जमा करण्यात आल्या व गेल्या पंधरा दिवसांत
नवी दिल्ली : चलनातून ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बाद करण्यात आल्यानंतर, जनधन खात्यांमध्ये मोठ्या प्रमाणात रकमा जमा करण्यात आल्या व गेल्या पंधरा दिवसांत त्यातून ३,२८५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. नोटाबंदीआधी ज्या खात्यांमध्ये ठणठणाट असायचा, त्याच खात्यांद्वारे कोट्यवधी रुपयांची उलाढाल झाल्याचे, काळ्या धनाचे पांढरे धन करून घेतले, गेले असा संशय आता व्यक्त होत आहे.
या खात्यांमध्ये ७ डिसेंबरअखेर विक्रमी ७४,६१० कोटी रुपये जमा झाले होते व त्यानंतर त्यातून पैसे काढण्यात आले व २८ डिसेंबर रोजी या खात्यांत ७१,०३७ कोटी रुपये जमा होते, असे अर्थमंत्रालयाने दिलेल्या माहितीत म्हटले आहे. जनधन खात्यांचा गैरवापर रोखण्यासाठी ३० नोव्हेंबरपासून या खात्यांतून दरमहा १० हजार रुपयेच काढता येतील, असे बंधन घालण्यात आले होते, तरीही गेल्या दोन आठवड्यांत त्यातून ३,२८५ कोटी रुपये काढून घेण्यात आले. जनधन खात्यांमध्ये जास्तीत जास्त ५० हजार रुपये भरण्याची मर्यादा होती. ९ नोव्हेंबर रोजी अशा सुमारे २५.५ कोटी खात्यांमध्ये ४५,६३७ कोटी रुपये होते. नोटाबंदीचा निर्णय झाल्यानंतर महिनाभराने जनधन खात्यांमध्ये पैसे जमा करण्याचा वेग वाढला.
बाद नोटा भरण्यासाठी अनिवासींना सवलत
नवी दिल्ली : चलनातून बाद करण्यात आलेल्या ५०० आणि एक हजार रुपयांच्या नोटा बँकेत भरण्याची मुदत ३० डिसेंबर रोजी संपली असली तरी अनिवासी भारतीयांसाठी ती ३० जूनपर्यंत आहे. राष्ट्रपती प्रणव मुखर्जी यांनी त्यासंदर्भातील अध्यादेशाला मान्यता दिली. बाद झालेल्या नोटा बाळगणारे किंवा त्या व्यवहारात आणणाऱ्यांना कठोर दंडाची तरतुदही या ताज्या अध्यादेशात आहे. अनिवासी भारतीयांना ३० जूनपर्यंत जास्तीतजास्त २५ हजार रुपयेच बँकेत भरता येतील. हीच मर्यादा ८ नोव्हेंबर ते ३० डिसेंबर या कालावधीत विदेशात असलेल्या भारतीयांनाही लागू आहे. मात्र त्यांना ३१ मार्चपर्यंत जुन्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या ठराविक कार्यालयांत जाऊनच बदलून घ्याव्या लागतील.
बाद झालेल्या नोटा बँकांच्या शाखांमध्ये जमा करताना कोणते घोषणापत्र (डिक्लेरेशन) व निवेदने सादर करावी लागतील याचा तपशील रिझर्व्ह बँक स्वतंत्रपणे सांगणार आहे.
कोणतेही घोषणापत्र खोटे आढळल्यास ५० हजार रुपये किंवा जेवढ्या नोटा जमा केल्या त्यांच्या दर्शनी मुल्याच्या पाच पट (जी रक्कम जास्त असेल) ती दंड भरावी लागेल, असे अर्थमंत्रालयाने निवेदनात स्पष्ट केले.
एटीएममधून काढा
४,५०० रुपये
रिझर्व बँकेने दिलेल्या निर्देशानंतर आता एटीएममधून रोज ४,५०० रुपये काढता येत आहेत. एटीएममधून ४,५०० रुपये देताना ते ५०० रुपयांच्या नोटांतील असावेत, असे बँकेने निवेदनात म्हटले आहे. मात्र, प्रत्यक्षात केवळ २ हजारांच्या दोन नोटाच मिळत असल्याचे चित्र अनेक एटीएमवर दिसून आले. एका आठवड्यात २४ हजार रुपयेच काढण्याच्या आधीच्या आदेशात काहीही बदल झालेला नाही.
नोटाबंदीनंतर ‘जनधन’मधील ठेवी दुप्पट
नोटाबंदीनंतर जन धन खात्यातील ठेवीत मोठी वाढ झाली आहे. ४५ दिवसांत या ठेवी दुप्पट झाल्या असून, यात सद्या ८७ हजार कोटी रुपये आहेत. कर विभाग या ठेवींबाबत माहिती घेत आहे, असे एका अधिकाऱ्याने सांगितले.
या खात्यांशिवाय कर विभागाकडे ४.८६ लाख अन्य खात्यांचीही माहिती आहे. यात ३० हजार ते ५० हजार रुपयांच्या जमा रकमेची आकडेवारी आहे. यात एकू ण दोन हजार कोटी रुपये जमा आहेत. १० नोव्हेंबर ते २३ डिसेंबरपर्यंत जनधन खात्यातून एकूण ४१,५२३ कोटी रुपये रक्कम जमा करण्यात आली आहे, तर ९ नोव्हेंबरपर्यंत या खात्यात ४५,६३७ कोटी रुपये जमा होते. या खात्यातील रक्कम ८७,१०० कोटी रुपयांवर पोहचली आहे. जनधन खात्यातील एकूणच माहितीचा तपास करण्यात येणार आहे. जर असे आढळून आले की, या खात्यातील रक्कम दुसऱ्याच व्यक्तीची आहे, तर कारवाई करण्यात येईल, असे एका अधिकाऱ्याने सांंगितले. नोटाबंदीनंतर पहिल्या आठवड्यातच
जनधन खात्यात २०,२२४ कोटी रुपये रक्कम जमा झाली आहे.