ब्लू व्हेल गेममुळे लखनऊतील शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी; पालकांनी दक्षता घेण्याचं शाळेचं आवाहन
By ऑनलाइन लोकमत | Published: September 11, 2017 08:27 AM2017-09-11T08:27:35+5:302017-09-11T08:31:35+5:30
व्हेल गेममुळे मुलांच्या आत्महत्यांचे प्रकार घडत असल्याने उत्तर प्रदेशात लखनऊमधील शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली आहे.
लखनऊ, दि. 11- मुलांना आत्महत्या करायला प्रवृत्त करणाऱ्या ब्लू व्हेल गेमने सगळीकडेच धुमाकूळ घातला आहे. मुलांनी ब्लू व्हेलच्या नादाला लागू नये, यासाठी आवाहनही केलं जातं आहे. आता शाळांनीसुद्धा त्यासाठी पुढाकार घेतला आहे. ब्लू व्हेल गेममुळे मुलांच्या आत्महत्यांचे प्रकार घडत असल्याने उत्तर प्रदेशात लखनऊमधील शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली आहे. ब्लू व्हेल चॅलेंज हा ऑनलाईन गेम घातक असून त्यात सहभागी व्यक्तीला अॅडमीनकडून आत्महत्या करायला भाग पाडलं जातं. जगभरात या गेमने दोनशे पेक्षा जास्त अधिक बळी घेतले आहेत.
मुलांच्या पालकांनी याबाबत दक्षता बाळगणं गरजेचं असून मुलं स्मार्टफोन वापरणार नाहीत, याकडे लक्ष द्यावं, असं शाळांचं म्हणणे आहे. ब्लू व्हेल गेममुळे लखनऊच्या इंदिरानगर भागातील आदित्यन वर्धन या चौदा वर्षांच्या मुलाने आत्महत्या केली होती. त्याचा संबंध ब्लू व्हेल गेमशी होता. त्यामुळे शाळांमध्ये स्मार्टफोनवर बंदी घालण्यात आली असून विद्यार्थ्यांची अचानक तपासणी करण्यात येणार आहे. शिक्षक व पालक यांना याबाबत काळजी घ्यायलाही सांगण्यात आलं आहे, अशी माहिती जिल्हा शाळा निरीक्षक मुकेश कुमार सिंह यांनी सांगितलं आहे.
मुलं अचानक अस्वस्थ किंवा तणावाखाली दिसली तर पालकांनी शंका घेऊन त्यांची विचारपूस करणं गरजेचं आहे. तसंच अशा मुलांचं समुपदेशन केलं जाईल असं त्यांनी स्पष्ट केलं. उत्तर प्रदेश पोलिसांनी सर्व जिल्ह्यांच्या पोलीस प्रमुखांना ब्लू व्हेलवर बंदी घालायला सांगितलं आहे, पण हा गेम डाऊनलोड करण्यासाठी काही लिंक असल्याने त्यावर बंदी घालणं शक्य होत नाही, ही सद्यस्थितील आहे. त्यासाठी संबंधित ऑनलाइन कंपन्यांशी संपर्क साधून त्यांना त्या लिंक काढून टाकायला सांगावं लागणार आहे. पोलीस अधिकारी शाळेच्या अधिकाऱ्यांशी संपर्क साधून मुलांना हा गेम खेळण्यापासून परावृत्त करतील. केंद्रीय माहिती व तंत्रज्ञान खात्याने याआधीच या गेमच्या लिंक ज्यावरून येतात त्या फेसबुक, गुगल व इन्स्टाग्राम यांना त्या काढून टाकण्याचा आदेश दिला आहे, असं पोलीस महासंचालक सुलखन सिंह यांनी सांगितलं आहे.